कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ हवे – शरद पवार

By Surendra Gangan | Last Updated: Sunday, January 6, 2013 - 07:42

www.24taas.com, मुंबई
कोकणातील विकासावर भर दिला पाहीजे. कोकणच्या विकासाठी आम्ही कटीबद्द असल्याचे सांगतानाच मुंबई विद्यापीठावर मोठा ताण पडत आहे, त्यासाठी कोकणात कोकणासाठी विनाविलंब नवे विद्यापीठ व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे केले.
गोरेगाव परिसरातील मुंबई एक्झि्बिशन सेंटरमध्ये कोकण भूमी प्रतिष्ठान आयोजित ‘ग्लोबल कोकण महोत्सव- २०१३`चे उद्‌घाटन शरद पवार यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. पर्यटनमंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, माजी सनदी अधिकारी द. म. सुकथनकर, आमदार भाई जगताप आणि विद्या चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी ‘कोकण व्हिजन-२०२५` हा कोकण विकास आराखडा सरकारकडे सुपूर्त करण्यात आला. तसेच कोकण विकासात भर घालणाऱ्या आठ व्यक्तींआचा ‘ग्लोबल पर्सनॅलिटी` आणि ‘कोकण आयडॉल` पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
पवार पुढे म्हणालेत, पंचेचाळीस वर्षांपूर्वी कोकणातील मानसिकता आणि आता नव्या तरुण पिढीची मानसिकता यामध्ये प्रचंड बदल झाला आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवल्यास सामूहिक प्रयत्नातून कोकणातील फलोत्पादन, मसाल्याची पिके, मत्स्योत्पादन आणि पर्यटनासाठीच्या पायाभूत सुविधा उभारणी, बाजारपेठेसाठी केंद्र यासाठी राज्य सरकार ठामपणे उभे राहील.
दरम्यान, कोकणातील पर्यटन विकासासाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण व्हायला हव्यात, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून कोकण विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे, असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं.
कोकणातील विशेषतः तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसून आला आहे. हा बदल खूपच सकारात्मक आहे. आंध्र प्रदेश आणि गुजरातसारखे राज्य मत्स्योत्पादनात वेगाने प्रगती करत आहेत. ऑर्नामेंटल फिशरीमध्ये केरळने चार हजार कोटींची उलाढाल केली. महाराष्ट्राने मात्र या क्षेत्रात अल्प प्रगती केली आहे. कोकणातील तरुणांना राज्य सरकारने पडीक जमिनी देऊन मत्स्योत्पादनासाठी प्रोत्साहित करावे. केंद्राच्या मत्स्य विकास मंडळाच्या वतीने भरघोस मदत केली जाईल, असे पवार यांनी सागंतिलं.
लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा
केंद्र सरकारच्या वतीने फलोत्पादन, मसाले आणि फिशरीसाठी अनेक योजना राबविल्या जातात. कोकणातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. दिल्लीतून यासंबंधीचे अधिकारी मी जिल्ह्यांमध्ये अगदी तालुका पातळीवर पाठवतो. तिथल्या तिथे अर्ज करा. जाग्यावर प्रकल्प मंजूर करून कोकणातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.

कोकणी माणसाने झाडाकडे पाहायचे का? - मुख्यमंत्री
कोणकचा विकास व्हायला पाहिजे. भरपूर निसर्ग आहे म्हणून कोकणी माणसाने झाडाकडे पाहायचे का?, असा सवाल करत कोकणाच्या विकासाला गाडगीळ समितीच्या शिफारशी मारक आहे. गाडगीळ समितीच्या शिफारशींविरोधात पंतप्रधानांकडे बैठक झाली असून कस्तुरीरंगन समिती यावर लवकरच अहवाल देणार आहे, असेही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
निसर्गाचे वैविध्य राखून विकास करता येतो, हे पाश्चाणत्त्य देशात सिद्ध झाले आहे. रस्ते आणि पायाभूत सुविधा होणे आवश्यक आहे. कोकणात आयसी चिप्स बनविण्याचे छोटे उद्योग येऊ शकतात. पर्यटक जास्त काळ राहिले पाहिजेत, यामध्ये सरकारची भूमिका नियंत्रकाची नव्हे, तर फॅसिलिटेटर म्हणून पार पडली पाहिजे. सर्वांगीण कोकण विकासासाठी लवकरच कोकणच्या आमदारांची स्वतंत्र बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.
कोकणात रासायनिक उद्योग नकोत
कोकणात रासायनिक उद्योग आणण्यास विरोध राहील, असे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी सांगितले. पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी कोकणातील विकास प्रकल्प उभारण्यात स्थानिकांचा विरोध होत असल्याचे सांगितले. कोकणातील विकासासाठी पर्यावरणवाद्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन भुजबळ यांनी या वेळी केले. विनोद तावडे यांनी पायाभूत सुविधा नसल्याने कोकणचा विकास खोळंबल्याचे सांगितले. कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी प्रास्ताविक केले.

First Published: Sunday, January 6, 2013 - 07:41
comments powered by Disqus