कुलगुरुपदी डॉ. किसन लवांडे - Marathi News 24taas.com

कुलगुरुपदी डॉ. किसन लवांडे


झी २४ तास वेब टीम, मुंबई

 
पुणे येथील राजगुरुनगर  केंद्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. किसन लवांडे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड करण्यात आली आहे.
 
राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मंगळवारी  मुंबईत कुलगुरू शोध समितीने निवडलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन डॉ. लवांडे यांच्या नावाची घोषणा केली. शिक्षण, संशोधन, विस्तार, व्यवस्थापन आणि प्रशासनामध्ये डॉ. लवांडे यांनी दीर्घकाळ काम केले आहे. त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातून एम.एस्सी. (उद्यान विद्या) पूर्ण करून भारतीय कृषी संशोधन संस्थेतून (आयएआरआय) पीएच.डी. पूर्ण केली आहे.
 
कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय मेहता ३जुलै २०११ रोजी निवृत्त झाले होते. त्यांच्या जागी डॉ. लवांडेंची निवड झाली असून, ती पुढील पाच वर्षांसाठी आहे. पंजाब हरियाना उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मुकुल मुद्‌गल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कुलगुरू शोध समितीने शिफारस केलेल्या पॅनेलमधून डॉ. लवांडे यांच्या नावाची घोषणा राज्यपालांनी केली. डॉ. व्ही. सदामते, डॉ. जाधव आणि डॉ. अरोरा हेही कुलगुरुपदाच्या शर्यतीत होते.

First Published: Wednesday, November 02, 2011, 05:01


comments powered by Disqus