सिनेमातील रियल लाइफ स्टोरी, २५ वर्षानंतर माय-लेकांची भेट

सात वर्षाचा मुलगा अचानक एके दिवशी घराबाहेर पडतो आणि कुटुंबीयांपासून दुरावतो. त्यानंतर सुरु होतो त्याचा संघर्ष आणि कुटुंबीयांच्या भावनांचा खेळ. मात्र २५ वर्षानंतर नियतीचा मनात काही औरच असतं आणि रक्ताच्या नात्यांची पुन्हा एकदा गळाभेट होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 17, 2013, 01:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,ठाणे
सात वर्षाचा मुलगा अचानक एके दिवशी घराबाहेर पडतो आणि कुटुंबीयांपासून दुरावतो. त्यानंतर सुरु होतो त्याचा संघर्ष आणि कुटुंबीयांच्या भावनांचा खेळ. मात्र २५ वर्षानंतर नियतीचा मनात काही औरच असतं आणि रक्ताच्या नात्यांची पुन्हा एकदा गळाभेट होते.
वर्षानुवर्षे एकमेंकापासून दूर राहूनही पुन्हा भेटलेल्या भावांच्या, मुलांच्या कथा आपण सिनेमात वारंवार पाहत आलोय. कधी कुंभमेळ्यात तर कधी परिस्थितीमुळे रिल लाईफमध्ये रक्ताच्या नाती दूर जातात आणि बऱ्याच वर्षांनी नियतीचा खेळ याप्रमाणे ते पुन्हा भेटतातही.
अशीच सिनेमाच्या कथेला साजेशी रियल लाइफ घटना ठाण्यात घडलीय. पंचवीस वर्षापूर्वी गणेश धांगडे आपल्या मित्रांसह शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र मित्राच्या ओळखीच्या व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडून तो मुंबईच्या दिशेने आला. सात वर्षांपूर्वी गणेश हा ठाणे रेल्वे स्थानकावरून हरवला. गर्दीमुळे दोघां मित्रांची ताटातूट झाली आणि पर्यायाने गणेश आपल्या कुटुंबीयांपासून दुरावला.
कुणाचीही सोबत नाही, गरीबी, अनेक हालअपेष्टा आणि धक्के सहन करत त्यानं जिद्दीने वरळीच्या आधी आनंद केंद्रात आणि नंतर ठाण्यात शिक्षण पूर्ण केलं. इतकंच नाही तर त्यानं मेहनतीच्या जोरावर ठाण्याच्या शीघ्र कृती दलातही तो सहभागी झाला.याचवेळी गणेशचा एका व्यक्तीशी संपर्क झाला. नियतीचा खेळ आणि सोशल नेटवर्किंग साईटची कमाल यामुळं २५ वर्षापासून दुरावलेला गणेश आपल्या कुटुंबीयांना भेटला.
गेली २५ वर्षे गणेशच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या त्याच्या कुटुंबीयांच्या आनंदाला जणू पारावर उरलेला नाही. रियल लाइफप्रमाणे गणेशची कथाही तितकीच संघर्षपूर्ण आणि भावनिक आहे. सिनेमाचा शेवट जसा गोड होतो अगदी त्याप्रमाणे २५ वर्षानंतर का होईना धांगडे कुटुंबीयांच्या घरी दिवाळीआधी महा दिवाळी साजरी होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.