`जेडीयू`ची `आप`ला समर्थनाची तयारी, केजरीवाल मुख्यमंत्री बनणार?

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा पेच वाढत चाललाय. याच दरम्यान नीतीशकुमार यांच्या पक्षानं म्हणजेच जेडीयूनं ‘आम आदमी पार्टी’ला समर्थन देण्याची तयारी दाखवलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 9, 2013, 04:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा पेच वाढत चाललाय. याच दरम्यान नीतीशकुमार यांच्या पक्षानं म्हणजेच जेडीयूनं ‘आम आदमी पार्टी’ला समर्थन देण्याची तयारी दाखवलीय.
जेडीयू नेते के. सी. त्यागी यांच्या म्हणण्यानुसार, जेडीयू पक्षानं आम आदमी पार्टीला कोणत्याही अटींविना समर्थन देण्याची तयारी दाखवलीय. परंतु, केजरीवाल यांनीच मुख्यमंत्री बनावं, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केलीय. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी या निवडणुकीला काँग्रेसविरुद्धचा जनादेश असंही संबोधित केलंय.
हा नरेंद्र मोदी इम्पॅक्ट आहे का? या चर्चेसंबंधी जेडीयूनं, हा मोदी लाट निवडणुकीत असती तर भाजप दोन तृतीअंश मतांनी निवडून आलं असतं. ही केवळ मोदींच्या नावाची निर्माण केलेली हवा आहे... याला मोदी लाट म्हणता येणार नाही, असंही जेडीयूनं म्हटलंय.
दिल्लीत नवी सरकार स्थापनेसंबंधी अनिश्चितता कायम आहे. आम आदमी पार्टीनं आपण कोणत्याही पक्षासोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. तसंच आपण विरोधी बाकावर बसण्यास तयार असल्याचंही सांगितलंय... किंवा आवश्यक असेल तर पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याची तयारीही दाखवलीय.
दिल्ली विधानसभेतील ७० जागांपैकी ३२ जागांवर भाजपला तर २८ जागांवर आम आदमी पार्टीला विजय मिळालाय. काँग्रेस दोन अंकी आकडाही गाठू शकली नाही. काँग्रेसला ८ जागांवर समाधान मानावं लागलंय. इतरांना दोन जागा मिळाल्यात. याचाच अर्थ कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही.
दिल्लीत ७० जागा आहेत आणि सरकार स्थापनेसाठी ३६ चा आकडा गाठणं गरजेचं आहे. भाजपकडे ३२ जागा आहेत, याचाच अर्थ भाजपला आता केवळ ४ जागांची गरज आहे. अपक्षांच्या दोन जागा भाजपला मिळाली तर हाच आकडा ३४ होईल. परंतु, हे समीकरणही बहुमताचा आकडा (३६) गाठू शकणार नाही, हे उघड आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.