राजकीय निवडणुका आणि 'सोशल मीडिया' इम्पॅक्ट

तरुण आणि सोशल मीडिया या दोघांचाही वेग आणि इम्पॅक्ट नजरेआड करुन चालणार नाही, याचं खणखणीत उदाहरण म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुकांचा ताजा निकाल.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 8, 2013, 03:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टेल मी अ सॉँग ऑन द टंग ऑफ युथ, अँड आय विल टेल द फ्युचर ऑफ द कंट्री असं स्वामी विवेकानंदांनी म्हंटलं होतं. आताच्या काळात टेल मी अबाऊट सोशल मीडिया इन द हँडस ऑफ युथ अँड आय विल टेल द फ्युचर ऑफ कंट्री असं म्हणावं लागणार आहे. तरुण आणि सोशल मीडिया या दोघांचाही वेग आणि इम्पॅक्ट नजरेआड करुन चालणार नाही, याचं खणखणीत उदाहरण म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुकांचा ताजा निकाल.
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ७ लाख ८० हजार ५४० नव मतदार होते. तर मध्य प्रदेशात हीच संख्या होती तब्बल १ कोटी, १ लाख, ९० हजार ७५५... छत्तीसगडमध्ये ११ लाख ७७ हजार ६१४ तरुणांनी पहिल्यांदाच मतदान केलं. तर राजस्थानमध्ये ४३ लाख ३४ हजार ८३६ नवमतदार होते. म्हणजेच जवळपास दीड कोटींपेक्षा जास्त मतदारांनी पहिल्यांदाच मतदान केलं.
हा सगळा `यंग इंडिया` राजकीयदृष्ट्या वेगळा विचार करणारा आणि सोशल मीडियाशी जवळीक साधणारा आहे... मागच्या पिढ्यांसाठी जसा टीव्ही महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा होता. तसंच इंटरनेट, फेसबुक, व्हॉटसअप आणि ट्विटरशिवाय आजच्या तरुणाईचं पानही हलत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच या पुढच्या सगळ्या निवडणुकांचा पॅटर्न बदलत जाणार आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये मतदान करणारी अख्खी पिढी ही मुक्त अर्थव्यवस्थेनंतर जन्माला आलेली पिढी आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची कमतरता असणे, हा प्रकारच त्यांना मान्य नाही. इतरांना जे मिळू शकतं, ते आम्हालाही मिळायला हवं, ही त्यांची धारणा त्यांनी `गुड गव्हर्नन्स`च्या बाबतीतही लागू केलीय. व्यवसायाच्या विविध संधी कुशलतेनं हाताळणारी ही पिढी पारंपारिक जातीच्या समीकरणांच्या राजकारणात मुळीच अडकून पडणार नाही.
राजस्थानचे निकाल पाहता हा मुद्दा अधोरेखित झालाय. आजच्या काळात व्हॉटस अप आणि फेसबुक हे तरुणाईचे कट्टे झालेत. ज्यावर देशातला युथ रिअॅक्ट होतो, वाद घालतो आणि काही सेकंदांमध्ये हे सगळं एकमेकांना फॉरवर्ड करतो. या सगळ्याचा वेग भन्नाट आहे.घरोघरी जाऊन मतं मागण्याऐवजी सोशल मीडियाच्या व्यासपीठावरुन काही क्षणांत कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचता येतंय. पुढच्या वर्षात १४ कोटी ९० लाख नवमतदार मतदानाचा हक्क बजावण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे तरुणांना टॅग करायचं असेल तर प्रत्येक राजकीय पक्षाला फेसबुक अकाऊंट उघडावंच लागणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.