शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला नाही; मुख्यमंत्री नाराज

शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला नाही, असं म्हणत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेवर स्पष्ट नाराजी व्यक्त केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 10, 2012, 09:09 AM IST

www.24taas.com, नागपूर
शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला नाही, असं म्हणत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेवर स्पष्ट नाराजी व्यक्त केलीय.
शिवाजी पार्कवरील चौथऱ्यावरून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त केलीय. शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला नाही, जागा पुर्ववत करण्याच्या अटीवरच शिवाजी पार्कमधला काही भाग बाळासाहेब ठाकरे यांच्या अंतिम संस्कारासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. पोलिसांनी आणि आयुक्तांनी केलेल्या सुचनेनंतर तत्कालीन परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारनं ही जागा शिवसेनेला तेवढ्या काळासाठी उपलब्ध करून दिली होती. ‘झी २४ तास’ला दिलेल्या विषेश मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी ही नाराजी व्यक्त केली.
या मैदानालाही स्वत:चा असा एक इतिहास आहे. पूर्वी हेच मैदान माहीम पार्क म्हणून ओळखलं जायचं. त्यानंतर त्याला शिवाजी पार्क हे नाव देण्यात आलं. शिवाजी महाराजांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या मैदानाची अस्मिता जपणंही गरजेचं आहे. सरकार लवकरच शिवसेना नेत्यांशी बोलून या प्रश्नावर मार्ग काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली