दीर्घकाळ जगायचंय तर एककीपणाला करा बाय-बाय!

तुमचं वय ६० पेक्षा जास्त आहे आणि तुम्ही पूर्णपणे एकाकी जीवन जगत असाल, तर तुम्हाला स्वत:ला एकलकोंड्या जीवनातून आणि तणावातून दूर ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 19, 2014, 09:24 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
तुमचं वय ६० पेक्षा जास्त आहे आणि तुम्ही पूर्णपणे एकाकी जीवन जगत असाल, तर तुम्हाला स्वत:ला एकलकोंड्या जीवनातून आणि तणावातून दूर ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.
एका ताज्या संशोधनानुसार, जास्त वयोगटातील व्यक्ती जर एकाकी जीवन अनुभवत असतील तर ते स्वत:ला मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचं काम करत आहेत. एकलकोंड्या जीवनामुळे मृत्यूचं प्रमाण १४ टक्क्यांनी वाढतं, असं या संशोधनात म्हटलं आहे.
इलिनोइजमध्ये यूनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या मनोविज्ञानाचे प्रोफेसर जॉन कॅकियोपो यांच्या म्हणण्यानुसार, वेळेपूर्वी मृत्यूच्या प्रकरणांमध्ये जसे प्रत्येक व्यक्तीचं सामाजिक आणि आर्थिक स्तर हे एक महत्त्वाचं कारण असतं त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचं एकाकी जीवन हेही खूप महत्त्वाचं कारण ठरतं. यामुळे वेळेअगोदरच मृत्यूची शक्यता १९ टक्क्यांनी वाढते. हा केवळ एकटेपणा किंवा शारीरिक संबंधांशी निगडीत नाही तर ही मानसिक आणि भावनिक गोष्ट आहे.
कॅकियोपो यांच्या म्हणण्यानुसार, वृद्ध लोक एकलकोंड्या अवस्थेत जगत असतील परंतु, सामाजिक रुपात व्यस्त जीवनशैली जगत असतील आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत मिळून - मिसळून राहत असतील तर एकाकी आणि तणावग्रस्त अवस्थेतून स्वत:ला वाचवू शकतील. वय वाढण्याबरोबर नजर कमजोर होणं, ऐकू येण्यात कमतरता जाणवणं अशीह परिस्थिती बऱ्याचदा आढळते, आणि अशा व्यक्तींचं एकाकी असणं जास्त धोकादायक ठरतं.
संशोधनानुसार, काही लोक असेही असतात जे एकटे खूप आनंदी असतात, पण बहुतांशी लोक सामाजिक परिस्थितीमध्ये राहून पुढे वाटचाल करतात. जिथं ते एकमेकांसोबत सहयोगाच्या माध्यमातून मजबूत नाते-संबंध कायम करतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.