महिलांनो आपले हृदय संभाळा

पुरुषांप्रमाणे महिलांनादेखील मोठय़ा प्रमाणात हृदयाचे आजार होतात. मधुमेह झालेल्या महिलेला हृदयविकार होण्याची शक्यता तीन ते चार पटीने अधिक वाढते, असे हृदयरोग विशेषज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 29, 2012, 01:08 PM IST

www.24taas.com,मुंबई
जगभरात हृदयाच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये महिलांना जास्त धोका असल्याचे दिसून येत आहे. मात्र, याबाबत महिला फारशा गंभीर नसल्याने त्यांना हृदयरोगाचा अधिक धोका आहे.
पुरुषांप्रमाणे महिलांनादेखील मोठय़ा प्रमाणात हृदयाचे आजार होतात. मधुमेह झालेल्या महिलेला हृदयविकार होण्याची शक्यता तीन ते चार पटीने अधिक वाढते, असे हृदयरोग विशेषज्ज्ञांचे म्हणणे आहे. वर्ल्ड हार्ट फेडरेशनतर्फे २९ सप्टेंबर `जागतिक हृदय दिवस` मानण्यात येतो. फेडरेशनने २०१२ हे वर्ष `महिला आणि मुलांचे हृदयविकारापासून संरक्षण` या रूपाने साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
हृदयरोगाचा धोका जास्त महिलांना होतो. जरी पुरुषांना हृदयविकाराचा धक्का बसल्यास छातीत दुखते, परंतु महिलांमध्ये वेगळी लक्षणे दिसून येतात. काही महिलांना हृदयविकाराचा धक्का बसल्यावर छातीत दुखत नाही. काही महिलांमध्ये कंबरेत दुखणे, पोटाच्या खालच्या भागात दुखणे, जबडा दुखणे, श्वाधसोच्छवासाची कमरता, मळमळ आणि उलटी आदी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे महिलांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
हा आजार वयस्क लोकांमध्ये आढळून येतो, परंतु त्याची सुरुवात बालवयात होते. त्यामुळे लहानपणापासूनच योग्य जीवनशैली आणि सवयी जोपासण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान अर्धा तास शारीरिक श्रम केले पाहिजे. रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढविणारे अन्नपदार्थ टाळले पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देतात.
अभ्यासकांच्या मते साधारणत: अर्ध्याहून अधिक महिलांचा मृत्यू हृदयाच्या आजाराने होतो. असे असताना हृदयविकार हा पुरुषांना होणारा आजार असल्याच्या भ्रमातून महिला बाहेर पडलेल्या नाहीत. त्यामुळे महिलांनी आपले हृदय जपण्याची खरी गरज आहे.