जन्मत: अंध निनादला आवाजाची देणगी!

जन्मत:च अंधत्व येऊनही संगीताच्या खडतर तपश्चर्येतून पुण्याच्या निनाद शुल्कने शास्त्रीय गायकापर्यंतचा प्रवास केला. आज देशभरात आपल्या गायनाच्या मैफीली तो रंगवतो... निनादच्या याच प्रेरणादायी प्रवासाची ही कहाणी...

Updated: Apr 21, 2017, 07:17 PM IST
जन्मत: अंध निनादला आवाजाची देणगी! title=

मुंबई : जन्मत:च अंधत्व येऊनही संगीताच्या खडतर तपश्चर्येतून पुण्याच्या निनाद शुल्कने शास्त्रीय गायकापर्यंतचा प्रवास केला. आज देशभरात आपल्या गायनाच्या मैफीली तो रंगवतो... निनादच्या याच प्रेरणादायी प्रवासाची ही कहाणी...

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण अगदी तंतोतंत जुळावी.... अशी निनाद शुक्लची कहाणी... जन्मत:च अंध असणाऱ्या निनादला संगीताची आवड लहानपणापासूनच होती. अडीच वर्षाचा असल्यापासून निनाद आपलं गाणं रेकॉर्ड करून ऐकायचा... बालगीतांपेक्षाही गीत रामायण, सुगम संगीत, भावगीत, यात तो रमायचा...

वयाच्या सहाव्या वर्षी आकाशवाणीच्या माध्यमातून त्याने पहिला परफॉर्मन्स केला... आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही... अनेक दिग्गज गायकांसमोर आपलं गाणं सादर करण्याची त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचं त्याने सोनंही केलं. हट्टाने शास्त्रीय गायनही निनाद शिकला. डॉक्टर विजय साठे यांच्याकडून त्याने मेवाती घराण्याची गायकी गुरुकुल पद्धतीने घेतली. 

वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी गायन आणि हार्मोनियम वादनात त्याने अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद ही पदवीही मिळवली. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक पुरस्कारही निनादने पटकावले आहेत. काही शिष्यवृत्त्याही त्याने मिळवल्या. संगीत क्षेत्रातल्या या यशस्वी कामगिरीबरोबरच त्याने तत्त्वज्ञान विषयात एम.ए. केलंय. 

पुण्यातच लहानाचा मोठा झालेला निनाद आज गाण्याच्या कार्यक्रमासाठी अनेक शहरांमध्ये प्रवास करतो. त्यासाठी निनादला त्याच्या आई-वडिलांचा खूप मोठा पाठिंबा आहे. आपल्याकडे असलेलं ज्ञान इतरांनाही द्यावं, या उद्देशाने आता त्याने स्वत:चे क्लासेसही सुरु केले आहेत. देवाने जरीही त्याची दृष्टी हिरावून घेतली असली तरीही त्याला आवाजाची अनोखी देणगी दिली आहे... आणि याच देणगीच्या जोरावर तो एक शास्त्रीय गायक म्हणून आपलं नावं सिद्ध करतोय. 

आपल्या अंधत्वावर मात करत निनादने संगीताची केलेली ही अनोखी वाटचाल खरंच कौतुकास्पद आहे. निनादच्या या वाटचालीला झी 24 तासचा सलाम...