यामुळे केलं सॅमसंग नोट ७चे उत्पादन बंद

  नोकिया, ब्लॅकबेरीनंतर अनेकवर्ष मोबाईल बाजारावर आपले वर्चस्व ठेवणाऱ्या सॅमसंग कंपनीची उलटी गनती सुरू झाली आहे. 

Updated: Oct 10, 2016, 08:49 PM IST
यामुळे केलं सॅमसंग नोट ७चे उत्पादन बंद  title=

सेऊल :   नोकिया, ब्लॅकबेरीनंतर अनेकवर्ष मोबाईल बाजारावर आपले वर्चस्व ठेवणाऱ्या सॅमसंग कंपनीची उलटी गनती सुरू झाली आहे. 

गॅलेक्सी नोट ७ या नव्याकोऱ्या स्मार्टफोननं त्यांना 'जोर का झटका' दिला आहे. या हँडसेटला आग लागण्याचा सिलसिला थांबतच नसल्यानं कंपनीनं नोट ७ चं उत्पादन थांबवल्याच्या बातम्या समोर येत आहे. त्यामुळे हा या कंपनीला खूप मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. 

१९ ऑगस्टला सॅमसंगनं आपला बहुचर्चित नोट ७ स्मार्टफोन लॉन्च केला होता. अपेक्षेप्रमाणेच त्यावर सॅमसंगप्रेमींच्या उड्या पडल्या. अॅपलच्या आयफोन-७ पेक्षा आपलं नाणं खणखणीत असल्याचं कंपनीला वाटू लागलं. पण काही दिवसांतच, चार्जिंग करताना नोट ७ ने पेट घेतल्याच्या बातम्या जगभरातून आल्या आणि हे सगळे फोन सॅमसंगला परत घ्यावे लागले. त्या बदल्यात कंपनीनं ग्राहकांना नवे हँडसेट दिले, पण त्याची बॅटरीही तापत असल्याच्या तक्रारी आल्या.

५ ऑक्टोबरच्या घटनेनं तर सॅमसंगची मोठीच बदनामी झाली. साउथवेस्ट एअरलाइन्सच्या विमानात नोट ७मधून धूर येत असल्याचं सगळ्यांनी पाहिलं. २१ सप्टेंबरला खरेदी केलेला हा स्मार्टफोन स्वीच-ऑफ असतानाही पेटल्यानं यूजर्सनी धसका घेतला आणि कंपनीला दणका बसला. त्यानंतर एटीअँडटी आणि टी-मोबाइल या दोन बड्या अमेरिकी कंपन्यांनी नोट ७च्या विक्री आणि अदलाबदल बंद केली. त्यामुळे सॅमसंगनं नोट ७ चं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त द. कोरियातील योन्हाप न्यूज एजन्सीनं दिलं आहे.