''गड्या...तू चांगला सिनेमा केलास''

Last Updated: Tuesday, December 27, 2011 - 17:50

अखेर 'शाळा'ला मुहूर्त मिळाला

प्रशांत अनासपुरे

prashant.anaspure@zeenetwork.com

 

मुंबईत थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल सुरू आहे....'शाळा'  या सुजय डहाके दिग्दर्शित सिनेमाला एकदाचा प्रदर्शनाचा मुहूर्त मिळाला. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात २० जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  गेल्या वर्षभरात या सिनेमाची केवळ चर्चाच होते आहे. पण प्रदर्शनाची तारीख नक्की होत नव्हती. या सिनेमाला प्रोड्युसर मिळत नव्हता, ही दिग्दर्शक सुजय डहाकेची खंत...पण चाळीसएक जणांकडे हेलपाटे मारून अखेर शाळा बॉक्स ऑफिसवर आणायची हिम्मत प्रोड्युसरने दाखवली आहे आणि सुजयचाही जीव भांड्यात पडला. तीन वर्षाची मेहनत फळाला आल्याचं समाधान सुजयच्या चेहऱ्यावर झळकत होतं.

 

शाळाचा एक खास शो काही मोजक्याच पण दर्दी प्रेक्षकांच्या उपस्थिती पार पडला. सिनेमात संतोष जुवेकर, जितेंद्र जोशी, आनंद इंगळे, अमृता खानविलकर आणि बरीच सारी 'टार्गट' शाळकरी पोरं म्हणून काम करत आहेत. दिग्दर्शकाची छाप या सिनेमातून नक्की उठून दिसते. मिलिंद बोकील यांच्या शाळा या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे, हे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहेच. पण कादंबरीतल्या अनेक म्हणजेच तब्बल शंभरावर पात्रांना एकत्र करून त्याची योग्य सांगड दिग्दर्शकानं जमून आणली. अमृता खानविलकर, आनंद इंगळे, जितेंद्र जोशी अशी उत्साही मंडळी असल्यानं या शाळेचा वर्ग बोअर होत नाही. या  सगळ्यात कमाल केली ती या शाळेतल्या पोरांनी. ए मला लाईन देते का...असं मुलीला बेधड विचारणारा शाळकरी पोरगा प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवून जातो. सिनेमाला स्वतः सुजय डहाकेही उपस्थित होता.

 

त्यामुळं प्रेक्षकांना सिनेमा कसा वाटतो, आपली ही शाळा प्रेक्षकांना रुचेल का, आवडेल का..याविषयी त्यालाही उत्सुकता होतीच. त्यातच स्वतः प्रोड्युसरही या शोला हजर होते. त्यामुळं सिनेमा थिएटरवर नेण्यापूर्वीची ही रंगीत तालीम दोघांच्याही दृष्टीनं महत्वाची होती. सिनेमाचा शेवटचा सीन संपला. आणि प्रेक्षकांतून एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली, गड्या, तू चांगला सिनेमा केलास. आणि या प्रतिक्रियेनंतर स्टेजच्या दिशेनं जाणाऱ्या सुजय डहाकेचं प्रेक्षकांनीही उभे राहून टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केलं. स्टेजवर येताच सुजयने सिनेमा जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं जाहीर केलं. सो, या शाळेत पोरांनी आणखी काय-काय करामती केल्यायेत हे आत्ताच सांगत नाही, ते तुम्ही प्रत्यक्ष पाहणंच जास्त मनोरंजक ठरेल....

First Published: Tuesday, December 27, 2011 - 17:50
comments powered by Disqus