दलितांचा आवाज बुलंद करतोय `दलित कॅमेरा`

Last Updated: Wednesday, January 8, 2014 - 08:51

www.24taas.com, जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई
दलितांचा आवाज आता इंटरनेटवर बुलंद होत आहे. दलितांवर होत असलेले अन्याय, त्यांचे प्रश्न हे यू-ट्यूबच्या सहाय्याने मांडण्याचं काम दलित कॅमेरा करत असतो. देशभरात कुठेही होत असलेल्या अन्याय मीडियापर्यंत पोहोचेलच असं नाही.
अनेक वेळा हे विषय बाजूला पडतात, असं दलित कार्यकर्त्यांना वाटतं, यावरून काही दलित कार्यकर्त्यांनी दलित कॅमेरा नावाचं चॅनेल यू ट्यूबवर बनवलं आहे. दलितांची आंदोलनं, प्रश्न आणि महिलांवरील अन्याय कॅमेरा बंद केल्यानंतर दलित कॅमेरावर अपलोड केले जातात.
दलित कॅमेऱ्याचा दिवसेंदिवस आवाका वाढतोय. सुरूवातीला दलित कॅमेरासाठी काम करण्यासाठी 23 लोकांची टीम आहे, आणि दलितांचे सामाजिक प्रश्न टिपणारे कॅमेरे आहेत फक्त चार. मात्र या चॅनेलला १४०० लोकांनी सबस्क्राईब केलं आहे. काही व्हिडीओ लोकांना एवढे जवळचे आणि ज्वलंत प्रश्न मांडणारे वाटतात की, एका व्हिडीओला ५० हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.
दलित कॅमेरावर व्हिडीओ अपलोड करण्याचं काम २०११ पासून सुरू झालं. सुरूवातीला आंध्रप्रदेशात लोकप्रिय असलेलं हे चॅनेल आता दक्षिण भारतासह जगभरात मोठ्या प्रमाणात पाहिलं जातं. केरळसह पश्चिम बंगालमध्ये दलित कॅमेरा मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर पाहिला जातो.
तामिळनाडूत १९९७ साली `दलितमास` नावाचं एक वर्तमान पेपर सुरू करण्यात आला होता. मात्र दुकानदारांनी तो विकण्यास विरोध केल्याने तो पेपर बंद पडल्याचं सांगण्यात येतं. मात्र इंटरनेटवर अशी कोणतीही मर्यादा नसल्याने दलित कॅमेरा सर्व काही टिपतोय आणि लोकांपर्यंत पोहोचतोय.
दलित कॅमेरा हे यू-ट्यूब चॅनेल एका दलित विद्यार्थ्यानेच सुरू केलं आहे. देशात आज दलितांची संख्या १६ ते १७ टक्के आहे. रविचंद्रन यांनी हे चॅनेल सुरू केलं, डोक्यावर मानवी मैला वाहण्याच काम करणाऱ्या जातीतून रविचंद्रन आहेत.
रविचंद्रन यांच्यावर विद्यापिठात एकदा गटानं हल्ला केला होता. यानंतर आपले प्रश्न कुठे मांडावेत असा प्रश्न रविचंद्रन यांना पडला, यातून रविचंद्रन यांनी यू-ट्यूबवर दलित कॅमेरा नावाचं चॅनेल तयार केलं, आणि दलितांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणारे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरूवात केली.
जे आहे तेच दलित कॅमेरावर दाखवण्यात येतं, यात इतर व्हिडीओंची भेसळ केली जात नाही, म्हणून यावर मूळ आणि खरेखुरे प्रश्न मांडले जातात.
दलित कॅमेरावरचे व्हिडीओ सत्याची बाजू लावून धरतात, म्हणून त्यात भडकपणा जाणवत नाही, आणि विश्वासार्हता वाढते.
सरकारकडून अनेक योजना चालवण्यात येत असल्याने, दलितांवरील अन्यायाचं प्रमाण कमी होत आहेत, असं म्हणता येणार नाही.
जयभीम कॉम्रेडसारख्या डॉक्यूमेन्ट्रीवरील चर्चाही तुम्हाला दलित कॅमेरावर दिसून येते.
दलितांवरील होत असलेल्या अन्यायाचं चित्र आणि त्या विरोधात उठवलेला आवाज संकलित करण्याचं काम दलित कॅमेरा करतोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 8, 2014 - 08:47
comments powered by Disqus