संपादकीय- सरदार सांगा कुणाचे ?

पोलादी पुरूष` अशी ओळख असलेले भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाच्या निमित्ताने नव्या वादाला तोंड फुटलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 30, 2013, 10:31 AM IST

डॉ. उदय निरगुडकर
मुख्य संपादक- झी २४ तास
www.24taas.com
पोलादी पुरूष` अशी ओळख असलेले भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाच्या निमित्ताने नव्या वादाला तोंड फुटलंय. अहमदाबादमध्ये सरदार पटेल म्युझियमच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज एकाच व्यासपीठावर आलेत. तर दुसरीकडे सरदार पटेलांच्या वारशावरून नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते एकमेकांना भिडलेत.
`सरदार पटेल सांगा कुणाचे..?` असा नवा वाद आता भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये सुरू झालाय. काँग्रेसने नेहमीच नेहरू-गांधी घराण्याची भलामण केली.मात्र `पोलादी पुरूष` सरदार वल्लभभाई पटेल यांचा वारसा जपला नाही, अशी टीका भाजपकडून नेहमी केली जाते. त्यामुळेच गुजरातच्या या महान सुपुत्राला उचित न्याय देण्यासाठी सरदार सरोवर प्रकल्पाजवळ पटेलांचे अतिभव्य स्मारक उभारण्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलीय. येत्या 31 ऑक्टोबरला या विराट स्मारकाचा कोनशिला समारंभ आयोजित करण्यात आला असून, त्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांकडून पोलादाचे तुकडे मागवण्यात आलेत. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी देशभरातून लोखंड जमा करण्याच्या योजनेस भंगार गोळा करण्याचे काम ठरवणाऱ्या काँग्रेसवर मोदी चांगलेच चिडलेत. अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्यापेक्षा उंच म्हणजे 182 मीटर उंचीचे सरदार पटेलांचे स्मारक उभारण्याचे मोदींचे स्वप्न आहे.
‘आपण अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, इंग्लंडच्या बिग बेन टॉवर आणि फ्रान्सच्या आयफेल टॉवरची चर्चा करतो. ही सर्व स्थळे त्या-त्या देशांच्या सन्मानांची प्रतीके आहेत. मात्र, आपल्याकडे स्वत:चे म्हणून काय आहे? मला वाटते लोहपुरुषाचा विशाल पुतळा- स्टॅच्यू ऑफ युनिटी हे त्याचे उत्तर असेल असं मोदींचं मत आहे आणि हाच सरदार पटेलांच्या स्मारक उभारण्याचा उद्देश.

एकंदरीतच या सर्व घटनांकडे पाहता सरदार पटेलांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते, हे भासवण्यासाठी खरंच एवढ्या उंच स्मारकाची गरज आहे का? काँग्रेस आणि भाजपवाल्यांनी `तुमचे गांधी, तर आमचे पटेल,` अशी महापुरूषांची वाटणी करून घेणे योग्य आहे का?
राममंदिराच्या वेळी घराघरातून विटा आणणारे भाजपवाले आता पटेलांच्या स्मारकासाठी देशभरातून लोखंड गोळा करण्याची टूम काढून लोकांच्या भावनांशी खेळत आहेत का? अशा प्रश्नांची उत्तरे पटेलांचा वारसा सांगणा-या काँग्रेस आणि भाजपवाल्यांनीही द्यायला हवीत...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.