निवडणुकीचा आखाडा, राजकारणाचे रंग

By Surendra Gangan | Last Updated: Sunday, February 23, 2014 - 20:30

www.24taas.com, झी मीडिया, ब्युरो
एकमेकांची स्तुती करणारे राजकीय नेते एकमेकांची उणीधुणी काढू लागले. आणि कालपरवापर्यंत एकमेकांवर आगपाखड करणारे, एकाच व्यासपीठावर येऊ लागलेत. निवडणुका जवळ आल्यात, म्हणूनच की काय महाराष्ट्राच्या राजकारणाचे असे रंग बदलू लागलेत.
एक काळ असा होता की, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे थकत नव्हते. मात्र अलिकडेच राज ठाकरेंनी अचानक पवित्रा बदलला आणि मोदींवर निशाणा साधला.महायुतीत मनसेचा प्रवेश होऊ न शकल्याने राज ठाकरे भाजपवर तोंडसुख घेतायत, असं कदाचित आपणाला वाटेल. मात्र नाशिकमध्ये गोदापार्कच्या भूमिपूजनाच्या वेळी राज ठाकरे आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी एकमेकांच्या कौतुकाचे पूल बांधताना दिसले.
केवळ दोन राजकीय पक्षांमध्येच अशी टोलेबाजी रंगते अशातला भाग नाही. तर एकाच पक्षातले दोन बडे नेते एकाच मुद्यावर कशी परस्परविसंगत भूमिका घेतात, तेही सध्या पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं तर महाराष्ट्र टोलमुक्त करू, अशी घोषणा भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. मात्र महाराष्ट्र टोलमुक्त करणं अशक्य आहे, असं भाजपचे वरिष्ठ नेते व टोलसंस्कृतीचे जनक नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.
अजून निवडणुका जाहीर झाल्या नाहीत तर ही स्थिती आहे. उद्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल, तेव्हा राजकारणाचे हे रंग दिवसागणिक आणि तासागणिक बदलत जातील, हे मात्र नक्की.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 23, 2014 - 20:30
comments powered by Disqus