कहाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्माची!

राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म कसा झाला याची एका रिपोर्टरच्या नजरेतून टीपलेली कहाणी... पुण्यात रिपोर्टिंग करत असतांना आलेला हा अनुभव! आता आठवणींचा एक एक तुकडा जोडतांना चित्र स्पष्ट होत जातं...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 23, 2014, 07:32 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म कसा झाला याची एका रिपोर्टरच्या नजरेतून टीपलेली कहाणी... पुण्यात रिपोर्टिंग करत असतांना आलेला हा अनुभव! आता आठवणींचा एक एक तुकडा जोडतांना चित्र स्पष्ट होत जातं...
स्थळ पुणे. वर्ष 1999. एप्रिल महिन्याचे शेवटचे दिवस.
`व्हय मी सावित्रीबाई` ह्या एकपात्री प्रयोग सादर करणा-या सुषमा देशपांडे वर्तमानपत्रांच्या कार्यालयात चीफ रिपोर्टरांना भेटत होत्या. मे महिन्यात बायोटेक्नॉलॉजी या विषयावर एक नॅशनल सेमिनार आयोजित करण्यात आला होता. त्याचे निमंत्रण त्या सगळ्या वृत्तपत्रांच्या कार्यालयात जाऊन देत होत्या. या सेमिनारचे उद्घाटन करणार होते 12 व्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार. खरं तर यात लक्षवेधी काहीही नव्हतं. शरद पवारांना बायोटेकमध्ये रस आहे हे सगळ्यांनाच माहित होतं. त्यामुळं करत असतील शरद पवार अजून एका सेमिनारचे उद्घाटन असं सगळ्यांना वाटलं. हे सेमिनारही भरणार होतं शरद पवारांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणा-या थरकुडे नावाच्या उद्योजकाच्या हॉटेल प्रेसिंडेट मध्ये. हे प्रेसिडेंट हॉटेल एरंडवण्यात प्रभात रोडवर नव्यानचं सुरु झालं होतं. निमंत्रण ठेवून घेऊन एखादा जनरल बीटचा रिपोर्टर किंवा फोटोग्राफर उद्घाटनाला पाठवायचा असं ठरवत चीफ रिपोर्टरांनी(सर्वसाधारणपणे वृत्तपत्रांमध्ये चीफ रिपोर्टर कुठला कार्यक्रम कव्हर करायचा आणि त्याला कोणाला पाठवायचे हे ठरवतात) त्या निमंत्रणाची फारशी दखल पुण्यातल्या वृत्तपत्रांनी घेतली नाही.
पण...
नंतर असं काही घडलं की फक्त पुण्यातल्याच नव्हे तर देशभरातल्या मीडियाला त्या प्रेसिडंट हॉटेलमधील सेमिनारला गर्दी करावी लागली.
हे कसं घडलं ते जाणून घेण्यापूर्वी काही नाटयमय घडामोडीं पाहूया ...

स्थळ नवी दिल्ली. मे १५, १९९९
काँग्रेस वर्किंग कमिटीची नवी दिल्लीतली बैठक. १३ व्या लोकसभेच्या निवडणुकासमोर आहेत आणि त्यांना कसं सामोरं जावं यावर वर्कींग कमिटीत चर्चा सुरू होती. या बैठकीत वर्किंग कमिटीच्या तीन सदस्यांनी प्राप्त राजकीय परिस्थितीतून काँग्रेसनं काय करावं यासाठी काही सूचना केल्या. सोनिया गांधी नुकत्याच राजकारणात सक्रीय झाल्या होत्या. गांधी परिवार राजकारणात सक्रीय नसल्यानं सीताराम केसरी यांच्याकडे काँग्रेसचं अध्यक्षपद होतं. सोनिया सक्रीय झाल्यानंतर अध्यक्षपद साहजिकच सोनियांकडे आलं. त्यांच्याच अध्यक्षतेखाली काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक सुरु होती. याच बैठकीत काय झालं याचं वर्णन सोनियांचे निकटवर्ती के. व्ही. थ़ॉमस यांनी `सोनिया - द बिलव्हड ऑफ द मासेस` या पुस्तकात केलं आहे.
थॉमस पुस्तकात म्हणतात की “शरद पवारांना पार्टीत सेंकड-इन- कमांड व्हायचं होतं. जर सोनिया पंतप्रधानपद झाल्या नाहीत तर आपली पंतप्रधान होण्याची इच्छा कधीच पूर्ण होई शकणार नाही याची कल्पना आल्यानंच त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीत एक खेळी केली”.
त्या बैठकीला थॉमस हजर होते आणि तिथं काय घडलं याचं वर्णन थॉमस यांनी असं केलं आहे "पांढ-या सोफ्यावर मागे रेलत शरद पवार यांनी पुर्णो संगमांकडे पहात स्मित केलं. पक्षात बंड करण्याचा तो हिरवा कंदिल होता- या बंडाची त्या बैठकीत उपस्थित असलेल्या अनेकांना कल्पना होती." याच बैठकीत शरद पवार, पुर्णो संगमा आणि तारिक अन्वर या सदस्यांनी ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्माला कारण ठरलेली मागणी केली.
``राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान ही पदे नैसर्गिक रित्या भारतात जन्मलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसाठीच असावीत अशी घटनेत दुरुस्ती करावी अशी मागणी काँग्रेसने करावी`" असा आग्रह शरद पवार, पुर्णो संगमा आणि तारिक अन्वर यांनी धरला. “वंशानं आणि जन्मानं भारतीय असलेला व्यक्ती सोडून इतर कोणी देशाचं प्रमुख होणं शक्य नाही," असं सांगत सोनिया गांधींच्या पंतप्रधान होण्याच्या महत्वाकांक्षेला थेट आव्हानच दिलं. अर्थात सोनिया गांधींनी पक्षाची उभारणी करण्यात दिलेलं योगदान किती महान आहे हेही सांगत आपला विरोध सोनियांनी पक्ष कार्य करण्याला नसून पंतप्रधान होण्याला आहे हेही पवार-संगमा-अन्वर यांनी खुबीनं स्पष्ट केलं. सोनिया समर्थकांच्या मते हे सोनिया गांधींविरुद्ध सरळसरळ बंड होतं तर शरद पवार आणि त्यांच्या सहका-यांच्या मते ते काँग्रेसला पुढे नेणारीच भूमिका मांडत होते! पवार, संगमा आणि अन्वर आणि इतर सदस्य यांच्यात मग वाद झाला. 12 व्या लोकसभेत विरोधी पक्ष नेते