गोल्ड रश.. काय हा खुळ्यांचा बाजार?

उत्तर प्रदेशातल्या उन्नावमधील दौंडिया खेरा नावाचं गाव अचानक जगाच्या नकाशावर आलंय.उत्तर प्रदेशातील दौंडिया खेरा गावात सुरू असलेली गोल्ड रश म्हणजे मानवी हव्यासाचा ताजा नमुना आहे. हा सर्व वेडाचार आहे. यावर एक प्रकाशझोत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 19, 2013, 12:19 PM IST

डॉ. उदय निरगुडकर, मुख्य संपादक, झी 24 तास
उत्तर प्रदेशातील दौंडिया खेरा गावात सुरू असलेली गोल्ड रश म्हणजे मानवी हव्यासाचा ताजा नमुना आहे. हा सर्व वेडाचार आहे. यावर एक प्रकाशझोत.
उत्तर प्रदेशातल्या उन्नावमधील दौंडिया खेरा नावाचं गाव अचानक जगाच्या नकाशावर आलंय. कारण काय तर म्हणे शोभन सरकार नावाच्या एका साधूबाबाला स्वप्न पडलं की, या गावात गुप्तधन दडवून ठेवलंय म्हणून. त्यामुळं 1 हजार टन सोन्याचा खजिना शोधण्यासाठी उत्खनन सुरू झालंय. ऐतिहासिक काळापासून दडवलेलं गुप्तधन सापडल्याची उदाहरणं देखील आहेत. अगदी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्याठिकाणी गुप्तधन सापडलं होतं. त्यामुळं गुप्तधनाबाबत कुणी काही सांगितलं की आपण त्यावर चटकन विश्वास ठेवतो. मेहनत करून, काबाडकष्ट करून श्रीमंत होण्यापेक्षा गुप्तधन शोधायला मानवी मन पटकन चटावतं. गुप्तधनाच्या शोधासाठी मग सुरू होतो वेडाचार. गोल्ड रशसारखा.
19 व्या शतकात जमिनीत दडलेल्या सोन्याच्या हव्यासानं ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेला पुरतं झपाटलं होतं. सोन्यासाठी पागल झालेल्या मानवी मनाच्या या विकृतीवर उपहासात्मक भाष्य करणारा मूक चित्रपट चार्ली चॅप्लिननं 1925 मध्ये काढला... त्याचं नावच होतं गोल्ड रश. आता देखील लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठीच दौंडिया खेरा गावात हा सोने उत्खननाचा घाट घातला गेलाय.
नानासाहेब पेशव्यांनी पुरलेलं हे धन असल्याचं सांगितलं जात असल्यानं मराठी माणसांची उत्सूकताही चाळवली गेलीय. परंतु हे दुसरं तिसरं काही नसून, पिपली लाइव्ह या गाजलेल्या हिंदी सिनेमाचं वास्तव दर्शनच आहे. दौंडिया खेरा गावात आता सोन्याचं उन्नाव लाइव्ह सुरू आहे. समजा गृहित धरू की, खरोखरच याठिकाणी 1 हजार टन सोनं सापडलं. तर आजच्या बाजारभावानुसार या सोन्याची किंमत होते 3 लाख कोटी रूपये. म्हणजे तिनावर 12 शून्य. एवढ्या रकमेचं सोनं सापडलं तर देशातील भय, भूक, गरीबी असे सगळेच प्रश्न अगदी चुटकीसरशी सुटतील... पुढच्या 30 वर्षांचा अन्नसुरक्षेचा खर्च भरून निघेल. या देशात कुणीही उपाशीपोटी झोपणार नाही. प्रत्येक खेडेगावात वीज पोहोचेल. प्रत्येक नागरिकाला शौचालयं पुरवता येतील. खेड्यापाड्यात चांगले रस्ते बनतील आणि पाण्यावाचून कुणीही तहानलेला राहणार नाही. भारतात कुणीही निरक्षर राहणार नाही.

काय हा खुळ्यांचा बाजार..? सोन्याच्या रूपातून एवढी रक्कम मिळाली तरी ती प्रत्यक्ष गरीबांच्या हातात पडणार का? त्यासाठी सोन्याचं स्वप्न पाहणा-या साधूबाबाकडे एखादा मंत्र आहे का..? एवढं सोनं भारताकडे आलं तर अमेरिका देखील कर्जासाठी भारतापुढं हात पसरेल. अमेरिकन दुतावासाऐवजी भारतीय दुतावासापुढच्या रांगा वाढतील. मग सगळेच आयतोबा होतील. कुणीही काम करणार नाही. मेहनत करणार नाही. याचा परिणाम म्हणून मग भारतावरही शटडाऊनसारखी पाळी येईल. यानिमित्ताने काही मुलभूत प्रश्न निर्माण होतात.
याठिकाणी खरोखरच सोने दडवलेले असेल तर एवढी वर्ष त्याचा खुलासा का झाला नाही? समजा याठिकाणी सोनं सापडलंच तर या सोन्याची मालकी कोणाकडे जाणार? प्रचलित कायद्यानुसार हे सोनं सरकार दरबारी जमा होणार का? कुणीतरी एक साधूबाबा सांगतो म्हणून आपलं सरकार उत्खनन करत बसणार का? हा देश बाबा आणि साधू मंडळी चालवतायत काय? अर्थशास्त्रज्ञ, भूगर्भ शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ यांना या देशात काहीच किंमत नाहीय का? बाबा आणि साधूंचं ऐकायचं की शास्त्रज्ञांचं..? याचा खुलासा एकदा व्हायलाच हवा.
हा सामूहिक संमोहनाचाच प्रकार असून, यापूर्वी सरकारी कृपेनंच गणपती दूध पिऊ लागला होता.. आता साधूबाबाच्या सांगण्यावरून सरकारनं सोन्यासाठी उत्खनन सुरू केलंय. उद्या अवकाशात काहीतरी सापडणार आहे, असा दृष्टांत कुणा साधूला झाला तर हे सरकार अंतराळवारी करायला परवानगी देणार का? एक बाबा सांगतो काळ धन घेऊन या. दुसरा बाबा सांगतो गुप्त धन शोधा. पण खरं सोनं जमिनीखाली नाही. श्रम करून पैसा मिळवा, हा खरा जीवनमंत्र देणारा बाबा आमटे मात्र आपण साफ विसरतो. श्रमविद्यापीठाची स्थापना करणा-या बाबा आमटेंच्या आश्रमाला यंदाच्या दिवाळीत एकदा तरी भेट देऊ या आणि खरं सोनं मिळवूया.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.