उष:काल होता होता काळ रात्र...

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, August 21, 2013 - 11:30

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
पुणं हे नेहमीच पुरोगामी चळवळीचं केंद्र राहिलंय. अनिष्ट रुढी आणि परंपरांविरोधात युद्ध पुकारणारे अनेक मोठे सुमाजसुधारक पुण्यानं दिले. या पुण्यभूमीतच समाजसुधारकांना छळालाही सामोरं जावं लागलं. पुरोगामी दाभोलकरांच्या बाबतीत मात्र प्रतिगामी शक्तींनी अमानुषतेचं टोक गाठलं. दाभोलकरांच्या हत्येमुळं उष:काल होता होता काळ रात्र झाल्याचाच अनुभव महाराष्ट्राला आलाय.

हा आक्रोश आहे पुरोगामित्वाचा, हा आक्रोश आहे चळवळींच्या महाराष्ट्राचा. एकोणीसव्या शतकात सुरू झालेल्या पुरोगामी चळवळींचा वारसा थेट एकवीसाव्या शतकात समर्थपणे नेणा-या डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा हा आक्रोश. महाराष्ट्रानं देशातल्या पुरोगामी चळवळीचा पाया रचला. राष्ट्रपुरूष महात्मा फुलेंनी सत्य़शोधक समाजाची स्थापना करून पुण्याला चळवळींचं केंद्र बनवलं. मात्र याच पुण्य़ात त्यांना मरण यातनाही सहन कराव्या लागल्या. सा-या समाजालाच बुरसटलेल्या प्रथांनी ग्रासलेलं असतानाच्या काळात फुलेंना झालेल्या यातना स्वाभाविकच होत्या. पुढे एकोणीसाव्या शतकात सत्यशोधकाचा हा नांगर आपल्या खांद्यावर घेऊन प्रबोधनकारांनी ही पुरोगामित्वाची चळवळ पुढे नेली. मात्र त्यांनाही फुलेंसारखाच त्रास सहन करावा लागला. त्यांच्या पुण्यातल्या वास्तव्यातच या चळवळीला तेज आलं. काळ बदलला, प्रश्न बदलले, त्यामुळं चळवळीचंही स्वरुप बदललं. अनेक धुरंधर या चळवळीशी जोडले गेले. मात्र आधुनिक महाराष्ट्रातला पुरोगामी चळवळीचा चेहरा ठरला तो नरेंद्र दाभोलकर.
अंधश्रद्धा निर्मुलनाची कास धरत, साने गुरूजींच्या साधनेच्या विचारांनी प्रेरित होत, फुलेंच्या सत्याचा शोध एकवीसाव्या शतकातही सुरूच ठेवला. दाभोलकरांनी हजारो मैल पायपीट करून अंनिसचं काम राज्यातल्या खेड्यापाड्यांमध्ये पोहचवलं. मात्र त्यांनीही फुले आणि प्रबोधनकारांसारखंच आपल्या चळवळीचं केंद्र पुण्यातच थाटलं. श्रद्धेच्या आहारी अंध झालेल्यांबरोबरच त्यांनी व्यसनमुक्ती आणि बुरसटलेल्या जातीव्यवस्थेविरोधातही शड्डू ठोकले. जनतेच्या प्रबोधनाबरोबरच पुरोगामित्वाला कायद्याची बैठक देण्यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले. प्रसंगी त्यासाठी त्यांनी सरकारशी दोन हात करण्यासही मागे-पुढे पाहिले नाही.
फुले आणि प्रबोधनकारांना जिथं छळाला तोंड द्यावं लागलं, त्याच पुण्यनगरीत त्यांचे पाईक असलेल्या दाभोलकरांची थेट हत्याच करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मुलनाच्या साधनेत मग्न असलेल्या या साधूच्या रक्ताचे डाग पुण्यावर कायम राहतील आणि पुरोगामित्वावरील हल्ल्याच्या वेदनेची सलही महाराष्ट्राला बोचत राहील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 21, 2013 - 11:30
comments powered by Disqus