आयपीएलनं लावलाय कलंक

आयपीएलमधल्या स्पॉट फिक्सिंगमुळे प्रेक्षकांचा विश्वासघात झालाय. जंटलमन गेम म्हणून ओळखल्या जाणा-या या खेळाला आयपीएलनं कलंक लावलाय. आयपीएलच्या या नौटंकीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या सर्व क्रिकेटवेड्या प्रेक्षकांचा विश्वासघात झालाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 16, 2013, 05:17 PM IST

वेब टीम, झी मीडिया
आयपीएलमधल्या स्पॉट फिक्सिंगमुळे प्रेक्षकांचा विश्वासघात झालाय. जंटलमन गेम म्हणून ओळखल्या जाणा-या या खेळाला आयपीएलनं कलंक लावलाय. क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटपटूंना देव समजणारा, क्रिकेटवेडा असा आपला देश. आयपीएलच्या मॅच पाहण्यासाठी क्रिकेटवेडे प्रेक्षक हजारो रुपये खर्च करतात. त्यातल्या एखाद्या संघाला मनापासून पाठिंबा देतात. आवडत्या क्रिकेटपटूला डोक्यावर घेतात. चौकार, षटकार, विकेट पडल्या की जल्लोष करतात. पण, आयपीएलच्या या नौटंकीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या सर्व क्रिकेटवेड्या प्रेक्षकांचा विश्वासघात झालाय.
चौकार, षटकार, विजय, पराजय सगळंच खोटं होतं, हे आता सिध्द झालंय. प्रेक्षकांच्या भावनांशी खेळणारा, त्यांचा विश्वासघात करणारा, खेळाला बदनाम करणारा आयपीएलचा हा कलंक हवा कशाला, असा प्रश्न आता विचारला जातोय. सुरूवातीपासून वादग्रस्त ठरलेल्या आयपीएलमध्ये अजून एका वादाला तोंड फुटलंय त्यांनं या खेळावरच प्रश्न चिन्ह निर्माण केलंय. का होतेय आयपीएल वादग्रस्त? का सुरू ठेवावी अशा स्पर्धा? आयपीएलचा नक्की फायदा होतोय तरी कोणाला? महाराष्ट्रात दुष्काळ असताना क्रिकेटला बदनाम करणा-या लीगच काय? आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.

दिल्ली पोलिसांनी आयपीएलमध्ये होत असलेल्या फिक्सिंगचा पुराव्यानिशी पर्दाफाश केला. एस. श्रीसंत, अजित चंदेलिया आणि अंकित चव्हाण यांनी केलेल्या स्पॉटफिक्सिंगचे पुरावे आणि मॅचमध्ये त्यानुसार दिलेले इशारे पत्रकारांसमोर मांडले. यंदाच्या आयपीएलमध्ये तब्बल ४० हजार कोटींचं फिक्सिंग झाल्याचा गौप्यस्फोट पोलिसांनी केलाय. राजस्थान रॉयल्सच्या एकूण तीन सामन्यांमध्ये फिक्सिंग झाल्याचे पुरावे पोलिसांनी दिले. चंदेलियानं पुण्याविरुद्धच्या सामन्यात, श्रीसंतनं पंजाबविरुद्ध मोहालीच्या मॅचमध्ये तर अंकितनं कालच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ओव्हरमध्ये किती धावा द्यायच्या, याबाबत फिक्सिंग केलं होतं.
या फिक्किंगसाठी खिशात टॉवेल ठेवणं, रिस्टबँडशी चाळा करणं, आधीच्या ओव्हरमध्ये ठराविक रन्स देणं अशा प्रकारचे संकेत ठरले होते. बुकी आणि या खेळाडूंमध्ये झालेला संवाद, बीबीएम आणि व्हॉट्सऍप याद्वारे झालेले मेसेजेस आणि त्या अनुषंगानं या बॉलर्सनी टाकलेल्या ओव्हर्स याची सांगड घालत फिक्सिंगचा पर्दाफाश केला. केरळमधला जिजू जनार्दन या नावानं ओळखला जाणारा एक बुकी श्रीसंतचा जवळचा मित्र असल्याचंही तपासात समोर आलंय. जिजू आणि श्रीसंत एका क्लबमध्ये क्रिकेट खेळत असल्यापासूनचे मित्र आहेत, असं स्पष्ट झालंय. दिल्ली पोलिसांनी आयपीएलमध्ये चालत असलेल्या या गोरखधंद्याचा बुरखा फाडलाय. आता या फिक्सर्सवर काय कारवाई होते आणि जंटलमेन्स गेम म्हणून ओळखल्या जाणा-या क्रिकेटमधले हे प्रकार थांबणार का, असा प्रश्न आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.