( शीत ) युद्ध आमचे झाले सुरु......

अमित जोशी चीन आणि भारत यांच्यामध्ये युद्ध सुरु झाले आहे असं म्हंटलं तर थोडसं गोंधळायला होईल, चटकन लक्षात येणार नाही. अर्थात हे विधान साफ चुकीचे आहे. पण दोन्ही देशांमध्ये शीतयुद्ध सुरु झाले आहे असं म्हंटलं तर ते चुकीचे होणार नाही.

Updated: Oct 26, 2011, 11:28 AM IST

अमित जोशी

चीन आणि भारत यांच्यामध्ये युद्ध सुरु झाले आहे असं म्हंटलं तर थोडसं गोंधळायला होईल, चटकन लक्षात येणार नाही. अर्थात हे विधान साफ चुकीचे आहे. पण दोन्ही देशांमध्ये शीतयुद्ध सुरु झाले आहे असं म्हंटलं तर ते चुकीचे होणार नाही.  कारण ह्याला सबळ पुरावा देणा-या काही घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत.   अर्थात प्रसारमाध्यमांमध्ये काही निवडक इंग्रजी वर्तमानपत्रे आणि इंग्रजी टीव्ही चॅनल्स ह्यांनी ही बातमी उचलून धरली तेसुद्धा काही काळ.  त्यामुळे या गोष्टीचे गांभीर्य सर्वसमान्यांपर्यंत पोहचणे अवघड आहे.

 

गेले काही दिवस भारतीय सीमाक्षेत्रात मग ती जमिनीवरील सीमा असो किंवा सागरी सीमा असो, चीन घुसखोरी करत आहे,  किंवा  सीमेरेषेच्या आत येत आपल्या अस्तित्वाच्या खूणा सोडत आहे.  हे सर्व सांगण्याचे कारण की 1962 चे चीनबरोबरचे युद्ध होण्यापूर्वी 1959 पासून अशीच घुसखोरी करायला चीनने सुरुवात केली होती. ऑगस्ट 1959 ला घुसखोरी करत चीनने सीमेवर गस्त घालणा-या 9 पोलिसांना ठार मारले होते. अखेर 1962 ला मोठी घुसखोरी करत, युद्ध करत 37,000 चौरस किमीपेक्षा जास्त भाग चीनने गिळंकृत केला, त्याला आज " अक्साई चीन " या नावाने ओळखतात.

 

अर्थात घुसखोरीचे टोक गाठत चीन पुन्हा काही भारताशी युद्ध छेडण्याची शक्यता कमी आहे. कारण  आशियातील या दोन " सिंघम " मध्ये होणारे युद्ध कोणालाच परवडणारे नसेल.  आज जगातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्था ह्या एकमेंकांशी संबंधित असतात. एका देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम दुस-या देशाला खड्ड्यात घालू शकतात. सध्या युरोपीय देशातील ग्रीसच्या कोसळलेल्या अर्थव्यवस्थेने सर्वांची पार झोप उडाली आहे.  असो.....तेव्हा आशियातील आपले वर्चस्व सिद्ध करत अमेरिकेला मागे टाकण्यासाठी आसुसलेला चीन  काहीही करु शकतो, कुठल्याही मार्गाचा अवलंब करु शकतो. त्यामुळेच भारतही चीनचे हे छुपे आक्रमण गंभीरपणे घेत आहे.

 

चीनचे सैनिक भारताच्या हद्दीत

14 सप्टेंबर 2011 ला चीनचे डझनभर सैनिकांनी लडाखपासून  ३०० किलोमीटरवर असलेल्या "  च्युमार " भागात घुसखोरी केली. सुमारे २०० मीटरपेक्षा जास्त अंतर भारतीय हद्दीत चालत येत तिथे असलेले खंदक उद्धवस्त केले.

एवढंच नाही तर २००९ च्या जुलै महिन्यात हिमाचल प्रदेशच्या चीनच्या सीमेलगतच्या " माऊंट गया " या भागात  चीनचे सैनिक तब्बल १.५किलोमीटर आत घुसले आणि तिथल्या दगडांवर लाल अक्षरात चीनी भाषेत चीन असे लिहल्यावर आरामात परतले.

 

ही दोन ठळक उदाहरणे आहेत. अर्थात अनेक घुसखोरी केलेल्या घटांनांची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचत देखील नाही. आता प्रश्न असा पडतो की एवढी घुसखोरी होतांना भारताचे सैनिक किंवा " इंडो तिबेट बॉर्डर पोलिस "  या सुरक्षा दलाचे सैनिक काय करत होते. खरं तर लडाख, तिबेटजवळचा भाग निर्जन, अत्यंत दुर्गम, डोंगराळ आणि रहदारीसाठी अत्यंत अवघड असा भाग आहे. प्रत्येक किलोमीटरवर सैनिक ठेवणेसुद्धा अत्यंत अवघड आहे,  अशक्य आहे. त्यातच या भागाची सरासरी ८,००० फुटापेक्षा जास्त उंची, आठ महिने कडाक्याची थंडी यामुळे इथे खडा पहारा देणेसुद्धा आव्हानात्मक आहे. त्यातच भारत-चीनची सीमा काही कुंपणाने आखली गेलेली नाहीये. एखाद्या टेकडीच्या पलिकडचा भाग चीनचा आणि अलिकडचा भारताचा अशी सीमारेषेची मांडणी करण्यात आली आहे.  त्यामुळे सतत गस्त घालत सीमेवर लक्ष ठेवणे हाच एकमेव आणि सर्वात चांगला पर्याय आहे. त्यामुळे घुसखोरीला अटकाव करणे अशक्य गोष्ट झाली आहे.

 

अंदमान बेटांजवळ चीनची संशोधन नौका