करारी आणि सडेतोड बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे हे सगळ्यात महत्त्वाचे पैलू.... शिवसेनेच्या वाटचालीत बाळासाहेबांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमध्ये त्यांचा करारीपणा दिसून आला. मुंबईत मराठी माणसावर परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, हा इशारा बाळासाहेबांनीच सगळ्यात पहिल्यांदा घालून दिला. बाळासाहेब जो विचार करायचे तो सडेतोडपणे मांडायचे आणि प्रत्यक्षातही आणायचे...... धर्मांध मुसलमानांना देशात राहण्याचा अधिकार नाही, हे वादग्रस्त मत बाळासाहेबांनी सडेतोडपणे मांडलं. मतांसाठी कुणावरही डोळा ठेवला नाही. महाराष्ट्रात मी मराठी आहे आणि देशात हिंदू आहे, हीच बाळासाहेबांची भूमिका होती. मी लोकशाही मानत नाही, असं बाळासाहेब निर्भीडपणे आणि ठणकावून सांगायचे.... राजकारण्यातल्या भल्याभल्यांवर टीका करताना बाळासाहेब कधीच कचरले नाहीत. राजकारणात निर्भीड आणि करारी असणारे बाळासाहेब वैयक्तिक आयुष्यात मात्र अत्यंत प्रेमळ होते. त्यांना भेटायला आलेल्या प्रत्येक माणसाशी ते आवर्जून संवाद साधायचे. कुणाचेही भलते लाड नाहीत, पण गरजवंताला मदत करताना त्यांचा हात आखडता कधीच नव्हता. |