अमावस्येच्या दिवशीच का करतात लक्ष्मीपूजन?

अश्विन अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी पूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी सर्वजण लक्ष्मीमातेची भक्तिभावाने पूजा करतात. लक्ष्मीपूजन आणि पूजनाच्या मुहूर्ताचे विशेष महत्त्व असते.

Updated: Oct 10, 2017, 01:11 PM IST
अमावस्येच्या दिवशीच का करतात लक्ष्मीपूजन? title=

मुंबई : अश्विन अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी पूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी सर्वजण लक्ष्मीमातेची भक्तिभावाने पूजा करतात. लक्ष्मीपूजन आणि पूजनाच्या मुहूर्ताचे विशेष महत्त्व असते.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे.

आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन का करतात?

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. लक्ष्मी ही संपत्तीची देवता तर कुबेर हा संपत्ती-संग्राहक असल्याचे मानले जाते. पैसा खर्च कसा करावा हे अनेकांना कळत नाही, त्यामुळे पैसा त्यांच्याजवळ शिल्लक रहात नाही. कुबेर ही देवता पैसा कसा राखावा हे शिकविणारी आहे असे मानले जाते. म्हणून या पूजेकरता लक्ष्मी व कुबेर या देवतांचे पूजन केले जाते. यासोबतच घरामध्ये सुखशांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते.

लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत

श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.

आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केर का काढतात?

आश्विन अमावास्येला सूक्ष्म स्वरूपात गतीमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि पुन्हा पूर्ण वायूमंडलात गतीमान होण्यास सुरुवात होते. केर काढल्यामुळे घरात शिरलेले त्रासदायक घटक आणि वायूमंडलात गतीमान असणारी त्रासदायक स्पंदने घराच्या बाहेर फेकले जातात. त्यामुळे घराचे पावित्र्यही टिकून रहाते असे मानले जाते म्हणून आश्विन अमावास्येच्या रात्री घरातील केर काढतात.