आज कोजागरी पौर्णिमा, कधी होणार पौर्णिमा पूर्ण?

आज देशभरात कोजागरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. अश्विन पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हटले जाते. पंचागकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी ही पौर्णिमा पूर्ण होणार आहे.

Updated: Oct 5, 2017, 07:43 AM IST
आज कोजागरी पौर्णिमा, कधी होणार पौर्णिमा पूर्ण? title=

मुंबई : आज देशभरात कोजागरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. अश्विन पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हटले जाते. पंचागकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी ही पौर्णिमा पूर्ण होणार आहे.

कोजागरीच्या रात्री चंद्राचा शंभर टक्के भाग प्रकाशित दिसणार आहे. त्यामुळेच या पौर्णिमेच्या चंद्राला ‘हार्वेस्ट मून’ म्हणतात. पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ७८ हजार ४२२ किलोमीटर अंतरावर असेल. चंद्रोदय गुरुवारी सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी होणार आहे, तर पूर्ण रात्रभर दर्शन देऊन सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी तो मावळेल.

कोजागिरीचे महत्व -

आश्विन पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सव आहे. वात्स्यायनाने याला कौमुदीजागर व वामन पुराणाने याला दीपदानजागर म्हटले आहे.बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे,त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते.या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे. 

खगोलशास्त्रदृष्ट्या महत्व -

या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.

धार्मिक महत्व -

या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मी व ऐरावतावर बसलेला इंद्र यांची पूजा करतात. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्व आहे. या रात्री मंदिरे, घरे, उद्याने, रस्ते इ. ठिकाणी दिवे लावतात. या रात्री जितके दिवे लावावे, तितके कल्प मानवाला सूर्यलोकात प्रतिष्ठा मिळते असे शास्त्र सांगते. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देवून स्वत: सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात.दुस-या दिवशी प्रात:काळी इंद्र-लक्ष्मीची पूजा करून व ब्राह्मण भोजन घालून पारणा करतात. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात. ब्रह्मपुराणत या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत.रस्ते झाडावेत. घरे सुशोभित करावीत.दिवसा उपवास करावा. गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी.