डिव्हिलिअर्सने १०४ चेंडूत ठोकल्या १७६ धावा

  कर्णधारपद सोडल्यानंतर पहिल्यांदा खेळताना दक्षिण आफ्रिकेचा धडकेबाज फलंदाज एबी डिव्हिलिअर्स याने बांगलादेश विरूद्ध दुसऱ्या वन डे सामन्यात १७६ धावांची धडकेबाज खेळी केली. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 18, 2017, 08:57 PM IST
 डिव्हिलिअर्सने १०४ चेंडूत ठोकल्या १७६ धावा title=

पार्ल :  कर्णधारपद सोडल्यानंतर पहिल्यांदा खेळताना दक्षिण आफ्रिकेचा धडकेबाज फलंदाज एबी डिव्हिलिअर्स याने बांगलादेश विरूद्ध दुसऱ्या वन डे सामन्यात १७६ धावांची धडकेबाज खेळी केली. 

हा डिव्हिलिअर्सचा आपल्या वन डे क्रिकेट करिअरमधील सर्वाधिक स्कोअर आहे. आपल्या १०४ चेंडूच्या खेळीत त्याने १५ चौकार आणि ७ षटकार ठोकले. काही क्षण असे वाटत होते की १९९६ मध्ये १८८ धावांचा गॅरी कर्स्टन यांचा विक्रम तोडून द्विशतक लगावेल. पण तेव्हाच त्याला रुबेल हुसैनच्या चेंडूवर शब्बीर रहमान याने झेलबाद केले. 

दक्षिण आफ्रिकेने सहा विकेट गमावरून बांगलादेशसमोर ३५३ धावांचा डोंगर रचला.  दक्षिण आफ्रिकेकडून बांगलादेशविरूद्ध सर्वात मोठी खेळी करणाऱ्या डिव्हिलिअर्सने हाशिम आमला (८६) सह तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावाची भागीदारी केली. 

६८ चेंडूत ठोकले शतक 

डिव्हिलिअर्सने केवळ ६८ चेंडूत शतक ठोकले. डिव्हिलिअर्सचे हे वन डेमधील २५ वे शतक आहे. तो वन डेमध्ये शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत आता सहाव्या स्थानावर पोहचला आहे. तो कुमार संघकारासह २५ शतकांसह सहाव्या स्थानावर आहे. त्याच्यापुढे हाशिम आमला २६ शतक, सनथ जयसूर्या २८ शतक, रिकी पॉन्टिंग ३० शतक, विराट कोहली ३० शतक आणि सचिन तेंडुलकर ४९ शतकसह पहिल्या क्रमांकावर आहे. 

२०० षटकार पूर्ण 

एबीने आपल्या वन डे करिअरमधील २०० षटकार पूर्ण केले आहेत. तसेच २०० षटकार पूर्ण करणारा तो सहावा फलंदाज बनला आहे. त्याच्या पुढे मॅकलम २००, धोनी २१३, गेल २५२, जयसूर्या २७० आणि पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी ३५१ षटकार ठोकून पहिल्या क्रमांकावर आहे.