भारताविरुद्धच्या टेस्टसाठी इंग्लंडच्या टीमची घोषणा, निवृत्त खेळाडूला संधी

भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Jul 26, 2018, 07:12 PM IST
भारताविरुद्धच्या टेस्टसाठी इंग्लंडच्या टीमची घोषणा, निवृत्त खेळाडूला संधी title=

लंडन : भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजसाठी इंग्लंडच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडच्या टीममध्ये निवृत्ती घेतलेला लेग स्पिनर आदिल रशीदला संधी देण्यात आली आहे. पहिल्या टेस्ट मॅचसाठी इंग्लंडनं १३ जणांच्या टीमची घोषणा केली आहे. एसेक्सचा फास्ट बॉलर जेमी पोर्टर याची पहिल्यांदाच टीममध्ये निवड झाली आहे. २५ वर्षांच्या पोर्टरनं ६१ प्रथम श्रेणी मॅच खेळल्या आहेत. पोर्टरनं २०१७ साली पहिल्या काऊंटी मोसमात ७५ विकेट घेतल्या होत्या. पोर्टरला दुखापत झालेल्या क्रिस वोक्सऐवजी टीममध्ये घेतलं आहे.

स्पिन बॉलरमध्ये इंग्लंडनं आदिल रशीदबरोबरच मोईन अलीलाही संधी दिली आहे. मोईन अलीनं २०१४ साली भारताविरुद्धच्या त्याच्या पहिल्याच सीरिजमध्ये १९ विकेट घेतल्या होत्या. इंग्लंडकडून ५० टेस्ट मॅच खेळणाऱ्या मोईन अलीनं मार्चमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटची टेस्ट खेळली होती.

आदिल रशीद २०१६ साली भारताविरुद्ध शेवटची टेस्ट खेळला होता. यानंतर तो दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या सीरिजसाठी बाहेर होता. अॅशेस सीरिजमध्येही रशीदला जागा मिळाली नव्हती. यानंतर त्यानं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रशीदनं ३ विकेट घेऊन मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता.

इंग्लंडची टीम

जो रूट(कर्णधार), मोईन अली, जेम्स अंडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, जॉस बटलर, एलिस्टेर कूक, सॅम कुरेन, कीटन जेनिंग्स, डेव्हिड मलान. जेमी पोर्टर, आदिल रशिद, बेन स्टोक्स