३ वर्ष आणि ११ खेळाडू बदलल्यानंतर विराटची चिंता मिटली

३ वर्ष आणि ११ खेळाडू बदलल्यानंतर अखेर भारतीय कर्णधार विराट कोहलीची चिंता मिटली आहे.

Updated: Oct 31, 2018, 04:27 PM IST
३ वर्ष आणि ११ खेळाडू बदलल्यानंतर विराटची चिंता मिटली title=

मुंबई : ३ वर्ष आणि ११ खेळाडू बदलल्यानंतर अखेर भारतीय कर्णधार विराट कोहलीची चिंता मिटली आहे. २०१५ वर्ल्ड कपनंतर ७२ वनडेमध्ये भारतानं चौथ्या क्रमांकावर ११ खेळाडूंचा वापर केला. पण यातल्या एकाही बॅट्समनला यशस्वी कामगिरी करता आली नाही. अखेर अंबाती रायुडूनं त्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. रायुडूनं चौथ्या नंबरवर खेळताना ४ इनिंगमध्ये ७२.३३ च्या सरासरीनं २१७ रन केले आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये केलेल्या शतकाचाही समावेश आहे. रायुडूच्या या खेळीनंतर वर्ल्ड कपमध्ये तोच चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करेल, असं विराट आणि रोहित शर्मा म्हणाले.

अंबाती रायुडूनं त्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेतला. २०१९ वर्ल्ड कपपर्यंत तो भारताकडून चौथ्या क्रमांकावर खेळेल. रायुडू बुद्धीमान आहे आणि त्याला खेळ बरोबर समजतो, असं वक्तव्य कोहलीनं केलं.

२०१३ साली २७व्या वर्षी अंबाती रायुडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. काही अर्धशतकं आणि शतक केल्यानंतरही त्याला टीममधून वगळण्यात आलं. अखेर २०१८ सालच्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यावर रायुडूची पुन्हा टीममध्ये निवड झाली. 

३२ वर्षांच्या रायुडूनं आशिया कपच्या १० मॅचमध्ये ३ अर्धशतकं केली. तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रायुडूनं ८० बॉलमध्ये शतक पूर्ण केलं.

३ वर्षात भारतानं वापरले ११ खेळाडू

२०१५ वर्ल्ड कपनंतर चौथ्या क्रमांकावर भारतानं ११ खेळाडूंचा वापर केला. पण यातल्या एकही खेळाडूला चमकदार कामगिरी करता आली नाही.

महेंद्रसिंग धोनी

२०१५ वर्ल्ड कपनंतर धोनीनं सर्वाधिक ११ वेळा चौथ्या क्रमांकावर बॅटिंग केलं. या ११ इनिंगमध्ये धोनीनं ३२.८१च्या सरासरीनं ३६१ रन केले आहेत.

अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणेनं चौथ्या क्रमांकावर १० इनिंगमध्ये ४६.६६ च्या सरासरीनं ४२० रन केले. यामध्ये ४ अर्धशतकांचा समावेश आहे.

युवराज सिंग

युवराज सिंगनं चौथ्या क्रमांकावर ९ वेळा बॅटिंग केली. त्यानं ४४.७५ च्या सरासरीनं ३५८ रन केले. यामध्ये एका दीडशतकी खेळीचाही समावेश आहे. पण या खेळीशिवाय युवीला कामगिरीत सातत्य दाखवता आलं नाही.

दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिकनं ९ इनिंगमध्ये ५२.८० च्या सरासरीनं २६४ रन केले आहेत. त्यामुळे रायुडूबरोबर कार्तिकही या स्थानासाठीचा दावेदार आहे.

मनीष-पांड्या-राहुल-जाधव अयशस्वी

या खेळाडूंशिवाय मनिष पांडे (७ इनिंगमध्ये १८३ रन), हार्दिक पांड्या (५ इनिंगमध्ये १५० रन), मनोज तिवारी(३ इनिंगमध्ये ३४ रन), लोकेश राहुल(३ इनिंगमध्ये २६ रन), केदार जाधव(३ इनिंगमध्ये १८ रन) या खेळाडूंनीही चौथ्या क्रमांकावर बॅटिंग केली. पण त्यांना स्वत:ची छाप पाडता आली नाही.