हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त, स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भारताला मोठा झटका लागला आहे.

Updated: Sep 19, 2018, 07:58 PM IST
हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त, स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर title=

दुबई : पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भारताला मोठा झटका लागला आहे. हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे बाहेर जावं लागलं. बॉलिंग करत असताना पांड्याला दुखापत झाली. स्ट्रेचरवरून पांड्याला मैदानातून बाहेर घेऊन जावं लागलं. पांड्या मैदानाबाहेर गेला तेव्हा पाकिस्तानचा स्कोअर 17.5 ओव्हरमध्ये 73-2 एवढा होता. हार्दिक पांड्याला दुखापत झाली तेव्हा पांड्या पाचवी ओव्हर टाकत होता. तेव्हा पांड्याच्या पायात गोळा आला. हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात येईल का याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही. हार्दिक पांड्याला ओव्हर पूर्ण न करता आल्यामुळे अंबती रायुडूनं पांड्याची ओव्हर पूर्ण केली.

पांड्यावर पहिले मैदानात उपचार

हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे जवळपास 7 मिनिटं मॅच थांबवण्यात आली होती. यावेळी भारतीय टीमचा फिजियो आणि मेडिकल टीम मैदानात आली. पांड्यावर मैदानातच प्रथमोपचार करण्यात आले. पण यानंतर त्याला स्ट्रेचरवरून नेण्यात आलं.

धोनीनं सोडला कॅच

हार्दिक पांड्या या मॅचमध्ये चांगली बॉलिंग करत होता. एकदा पांड्या विकेट घेण्याच्या जवळ होता पण धोनीनं कॅच सोडल्यामुळे पांड्याला विकेट मिळाली नाही. धोनीनं हार्दिकच्या बॉलिंगवर शोएब मलिकचा कॅच सोडला. त्यावेळी मलिक 26 रनवर खेळत होता.

हाँगकाँगविरुद्धच्या मॅचसाठी हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे आसिया कपमधली हार्दिक पांड्याची ही पहिलीच मॅच होती.