स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सलमान बट पुन्हा अडकणार? आयसीसीकडून चौकशी सुरू

स्पॉट फिक्सिंगप्रकरणात दोषी असलेला पाकिस्तानचा माजी कॅप्टन सलमान बट पुन्हा एकदा फिक्सिंगमध्ये अडकण्याची चिन्ह आहेत. 

Updated: Jan 31, 2018, 07:36 PM IST
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सलमान बट पुन्हा अडकणार? आयसीसीकडून चौकशी सुरू title=

मुंबई : स्पॉट फिक्सिंगप्रकरणात दोषी असलेला पाकिस्तानचा माजी कॅप्टन सलमान बट पुन्हा एकदा फिक्सिंगमध्ये अडकण्याची चिन्ह आहेत. यूएईमध्ये नुकत्याच झालेल्या ऑल स्टार टी20 लीगमध्ये फिक्सिंग झाल्याचा संशय आयसीसीला आहे. आयसीसीचं भ्रष्टाचारविरोधी पथक याची चौकशी करत आहे. या ऑल स्टार टी20 लीगमध्ये सलमान बटही सहभागी झाला होता.

सलमान बट आणि मोहम्मद आसिफ यांच्यावर २०१० साली स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळल्यावर पाच वर्षांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण हे दोघंही काही मान्यता प्राप्त नसलेल्या टूर्नामेंटमध्ये सहभागी झाले होते.

ऑल स्टार टी20 लीगच्या मॅचमध्ये खेळाडू संशयास्पदरित्या रन आऊट झालेले पाहायला मिळाले. यानंतर आयसीसीनं चौकशीला सुरुवात केली आहे. सलमान बट आणि मोहम्मद आसिफ यांच्याशिवाय पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझा आणि मोहम्मद खलील यांनीही या स्पर्धेत भाग घेतला होता.

सलमान बटची प्रतिक्रिया

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात फसल्यानंतर मी वादांपासून लांब राहतो. आयसीसीनं याच्या चौकशीला सुरुवात केली ही चांगली गोष्ट आहे. मी या स्पर्धेतल्या फक्त दोन मॅच खेळलो आणि दुबईला निघून गेलो. लाहोरच्या वनडे टीममध्ये माझी निवड झाली नसल्यामुळे मी ही स्पर्धा खेळायला गेलो. ही स्पर्धा मान्यताप्राप्त नाही, तसंच मॅच रेफ्री, आयसीसीचा भ्रष्टाचारीविरोधी अधिकारी आणि स्कोररही नसल्याचं तिकडे गेल्यावर माझ्या लक्षात आलं, अशी प्रतिक्रिया सलमान बटनं दिली आहे.