विराट कोहलीसह ‘या‘ खेळाडूला खेलरत्न पुरस्कार प्रदान

मागील तीन वर्षांपासून कोहलीची या पुरस्कारासठी शिफारस करण्यात आली होती. पण...

ANI | Updated: Sep 25, 2018, 07:00 PM IST
विराट कोहलीसह ‘या‘ खेळाडूला खेलरत्न पुरस्कार प्रदान title=

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना मंगळवारी एका दिमाखदार सोहळ्यात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका कार्यक्रमात देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

खेळाडूंची गेल्या वर्षभरातील कामगिरी पाहून त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

विराट कोहली हा आतापर्यंत खेलरत्न मिळवणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी सचिन तेंडुलकर (१९९७) आणि महेंद्रसिंह धोनी (२००७) यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

मागील तीन वर्षांपासून कोहलीची या पुरस्कारासठी शिफारस करण्यात आली होती. पण २०१६ मध्ये कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांना तर, २०१७ मध्ये हॉकीपटू सरदार सिंग आणि खेळाडू देवेंद्र झजरिया यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

दरम्यान, या पुरस्कार प्रदान सोहळ्यात खेळाडूंच्या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारही प्रदान करण्यात आले.

सहसा हा पुरस्कार प्रदान सोहळा २९ ऑगस्ट म्हणजेच मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिवशी पार पडतो. पण, यंदा त्याचदरम्यान आशियाई खेळांचं आयोजन करण्यात आल्यामुळेच या सोहळ्याची तारीख बदलण्यात आली होती.