पद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी धोनी लष्कराच्या गणवेशात

भारताचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.

Updated: Apr 2, 2018, 06:57 PM IST
पद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी धोनी लष्कराच्या गणवेशात title=

नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते धोनीला हा सन्मान देण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राज्यमंत्री किरेन रिजीजू उपस्थित होते. धोनीची पत्नी साक्षीही या सोहळ्यासाठी त्याच्यासोबत होती.

लष्कराच्या गणवेशात आला धोनी

पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी धोनी लष्कराच्या गणवेशात आला होता. धोनीला भारतीय लष्करानं लेफ्टनंट कर्नलचा दर्जा दिला आहे. त्यामुळे धोनी लष्कराचे कपडे घालून या सोहळ्याला आला. लष्करी जवानासारखीच परेड करत आणि सलाम करून धोनीनं हा पुरस्कार स्वीकारला.

आजच्याच दिवशी घडला होता इतिहास

७ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी भारतानं क्रिकेटमध्ये इतिहास घडवला होता. २ एप्रिल २०११ साली भारतानं धोनीच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला होता. फायनलमध्ये महत्त्वाची खेळी करत धोनीनं सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला होता. १९८३ मध्ये चॅम्पियन बनल्यानंतर २८ वर्षांनी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्डकप जेतेपद पटकावले.

धोनीला मिळालेले पुरस्कार

महेंद्रसिंग धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान अनेक सन्मान मिळवलेत. २००८मध्ये त्याला आयसीसी वनडे प्लेयर ऑफ दी ईयर अॅवॉर्ड, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि २००९ मध्ये भारतातील चौथा सर्वोच्च नागरिक सन्मान, पद्मश्री पुरस्कारासह २००९मध्येच विस्डेनच्या सर्वप्रथम ड्रीम टेस्ट इलेव्हन संघात धोनीचा कर्णधाराचा दर्जाही मिळालाय.