श्रीलंकेचे क्रिकेटपटू अर्जुना रणतुंगांना अटक

श्रीलंकेचा क्रिकेटपटू अटकेत

Updated: Oct 29, 2018, 10:28 PM IST
श्रीलंकेचे क्रिकेटपटू अर्जुना रणतुंगांना अटक  title=

कोलंबो : श्रीलंकेमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. रविवारी झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान महिंद्रा राजपक्ष समर्थकाच्या मृत्यूप्रकरणी पेट्रोलियम मंत्री आणि माजी क्रिकेटपटू अर्जूना रणतुंगा यांना अटक करण्यात आली आहे. रणतुंगा हे पदच्युत पंतप्रधान रानिल विक्रमसिंगे यांचे कट्टर समर्थक आहेत. रविवारी पेट्रोलियम मंत्रालयाबाहेर रणतुंगा यांच्या अंगरक्षकानं आंदोलकांवर गोळ्या चालवल्या. श्रीलंकेमध्ये सध्या प्रचंड राजकीय अस्थीरता असून रणतुंग यांच्या अटकेमुळे यात भर पडण्याचीच शक्यता आहे.

श्रीलंकेत जोरदार राजकीय घडामोडी घडल्यात. महिंदा राजपक्षे यांनी शुक्रवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतलीय. राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी रनिल विक्रमसिंघे यांच्या पक्षासोबतची युती तोडून राजपक्षे यांची पंतप्रधानपदी नेमणूक केली.

विशेष म्हणजे २०१५ मध्ये सिरीसेना हे राजपक्षे यांचा पराभव करत राष्ट्रपतीपदावर विराजमान झाले होते. श्रीलंकेचे राष्ट्रपती सिरीसेना यांच्या युनायटेड पीपल्स फ्रिडम अलायन्सने रनिल विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीसोबतच्या आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.

यानंतर सिरीसेना यांनी पंतप्रधानपदी महिंदा राजपक्षे यांची नियुक्ती केली. राजपक्षे यांनी विक्रमसिंघे यांची जागा घेतली आहे. सिरीसेना आणि विक्रमसिंघे यांच्यातील तणावपूर्ण संबंधामुळे या घडामोडी घडल्या. राजपक्षे हे चीनधार्जिणे असून या घडामोडींकडे भारताचंही लक्ष लागलंय.