काश्मीर प्रश्नावर बरळणाऱ्या आफ्रिदीला गंभीरचं सडेतोड प्रत्युत्तर

काश्मीर प्रश्नावर वादग्रस्त ट्विट करणाऱ्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला गौतम गंभीरनं सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

Updated: Apr 3, 2018, 07:23 PM IST
काश्मीर प्रश्नावर बरळणाऱ्या आफ्रिदीला गंभीरचं सडेतोड प्रत्युत्तर title=

मुंबई : काश्मीर प्रश्नावर वादग्रस्त ट्विट करणाऱ्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला गौतम गंभीरनं सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. आपलं काश्मीर आणि यूएनबाबत आफ्रिदीनं केलेल्या ट्विटवर माध्यमांनी माझ्याकडे प्रतिक्रिया मागितली. याबाबत काय बोलायचं? शाहिद आफ्रिदीसारख्या मंदबुद्धीच्या शब्दकोशात यूएन म्हणजे अंडर १९, तेवढं त्याचं वय आहे. माध्यमांनी याबाबत चिंता करु नये. आफ्रिदी नो-बॉलवर विकेट मिळाल्यानंतर आफ्रिदी जल्लोष करतोय, असं ट्विट गौतम गंभीरनं केलं आहे.

काय म्हणाला शाहिद आफ्रिदी

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं काश्मीर प्रश्नात आपलं नाक खुपसलं आहे. भारत व्याप्त काश्मीरमध्ये निष्पाप नागरिकांची हत्या करण्यात येत आहे. स्वातंत्र्य मागणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था आता कुठे आहेत? या संस्था रक्तपात थांबवण्यासाठी कोणताच प्रयत्न का करत नाहीत, असं ट्विट शाहिद आफ्रिदीनं केलं आहे.

१३ दहशतवाद्यांचा भारतानं केला खात्मा

काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं १३ दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आफ्रिदीनं हे ट्विट केलं आहे. काश्मीरमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या एन्काऊंटरमध्ये १३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. यामध्ये भारताचे तीन जवान शहीद झाले तर ४ नागरिकांना प्राण गमवावे लागले. अरविंदर कुमार, निलेश सिंग आणि सेपॉय हेतराम हे जवान शहीद झाले.

२ दहशतवाद्यांची ओळख पटली

रईस अहमद ठोकर आणि इशफाक अहमद मलिक असं मारण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची नावं आहेत. या दहशतवाद्यांनी मे २०१७ मध्ये भारतीय लष्कराचे अधिकारी उमर फैयाज यांची सुट्टीवर असताना घरात हत्या केली होती.

याआधीही केलं वादग्रस्त वक्तव्य

याआधी २०१६ साली भारतात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपवेळी आफ्रिदीनं काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ही मॅच बघण्यासाठी अनेक काश्मिरी आले आहेत, असं आफ्रिदी तेव्हा म्हणाला होता. २०१७ साली निवृत्त झालेला आफ्रिदी पाकिस्तानकडून २७ टेस्ट, ३९८ वनडे आणि ९८ टी-20 खेळला आहे. २०११ सालच्या वर्ल्ड कपमध्ये आफ्रिदीनं पाकिस्तानचं नेतृत्व केलं होतं.