हॉकी वर्ल्ड लीग फायनल : बेल्जियमला हरवत भारत सेमीफायनलमध्ये

हॉकी वर्ल्ड लीग फायनलमधील अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने बेल्जियमवर मात केली. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 7, 2017, 08:12 AM IST
हॉकी वर्ल्ड लीग फायनल : बेल्जियमला हरवत भारत सेमीफायनलमध्ये title=

भुवनेश्वर : हॉकी वर्ल्ड लीग फायनलमधील अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने बेल्जियमवर मात केली. 

भारताने ऑलिंपिक उपविजेत्या बेल्जियमला सडन डेथमध्ये हरमनप्रीत सिंगच्या गोलच्या जोरावर हरवले. 

सडन डेथमध्ये भारताचा विजय

निर्धारित वेळेत दोन्ही संघानी ३-३ अशी बरोबरी साधली. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा निर्णय घेण्यात आलाय. यातही २-२ अशी बरोबरी साधली गेली. त्यानंतर सडन डेथमध्ये भारताच्या हरमनप्रीतने गोल केलाय मात्र बेल्जियमच्या ऑर्थर वान डोरेनला गोल करण्यात अपयश आले. 

शूटआऊटमध्ये भारताकडून ललित उपाध्याय आणि रुपिंदर पाल सिंगने गोल केले तर बेल्जियमकडून ऑर्थर आणि जॉन डोमेन यांनी गोल केले. 

सामन्यातील हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघाना एकही गोल करता आला नव्हता. ब्रेकनंतर भारताने पहिल्याच मिनिटाला खाते खोलले. आकाशदीपच्या पासवर गुरजत सिंगने शानदार गोल केला. 

हाफ टाईमपर्यंत एकही गोल नाही

त्यानंतर चारच मिनिटांनी हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. दोन गोलने पिछाडीवर असणाऱ्या बेल्जियम संघाने ३९व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केला आणि खाते उघडले. त्यानंतर ४६व्या मिनिटाला त्यांना आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. या पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये करण्यात बेल्जियमला यश आले आणि त्यांनी बरोबरी साधली.