आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ आणि कोहली पहिल्या क्रमांकावर कायम

भारतीय संघाचे कसोटीत एकूण ११६ अंक आहेत. 

Updated: Jan 22, 2019, 01:03 PM IST
आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ आणि कोहली पहिल्या क्रमांकावर कायम title=

दुबई : भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २-१ ने कसोटी मालिका जिंकली. द्विसंघ मालिका विजय हा भारताने पहिल्यांदाच मिळवला. त्यामुळे हा विजय भारतासाठी ऐतिहासिक ठरला. या विजयासोबत ज्या प्रकारे अनेक विक्रम भारतीय संघाने रचले तसेच काही विक्रम भारतीय संघाने आणि कर्णधार कोहलीने देखील केले आहेत. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे भारताला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आपले पहिले स्थान कायम ठेवता आले आहे. भारतीय संघाचे कसोटीत एकूण ११६ अंक आहेत. 

आयसीसी कसोटी क्रमवारी

कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीत अग्रस्थानी कायम आहे. कोहलीचे कसोटीत एकूण ९२२ अंक आहेत. तर कोहलीच्या खालोखाल न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ८९७ अंकासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केलेला चेतेश्वर पुजारा आयसीसीच्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे एकूण अंक ८८१ इतके आहेत. फलंदाजांच्या टॉप-२० च्या यादीत, टॉप-३ मध्ये असलेल्या कोहली आणि पुजारा यांच्या आसपास देखील भारतीय फलंदाज नाहीत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चर्चेत राहिलेला रिषभ पंत या यादीत ६७३ अंकांसह १७ व्या स्थानावर आहे. 

गोलंदाजांची कामगिरी 

आयसीसीच्या कसोटी गोलंदाजाच्या क्रमवारीत भारताचा रविंद्र जडेजा ७९४ अंकांसह पाचव्या क्रमांकावर आहे. तर नवव्या क्रमांकावर फिरकीपटू आर आश्विन ७६३ अंकासह आहे. त्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ७११ अंकांसह १५ व्या क्रमांकावर विराजमान आहे. तर दक्षिण अफ्रिकेचा खगिसो रबाडा हा ८८२ अंकासह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

इंग्लंड संघाला कसोटी क्रमावारीतील तिसरा क्रमांक कायम ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. वेस्ट इंडिजशी  उद्यापासून (बुधवार)  इंग्लंड संघाच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होते आहे. यात इंग्लंडला मालिका विजय आवश्यक असणार आहे. इंग्लंडने जरी वेस्ट इंडिजचा कसोटीत ३-० असा क्लीन स्वीप पराभव केला, तरी इंग्लंडचे अंक हे १०९ इतके होतील. त्यामुळे भारतीय संघाच्या पहिल्या क्रमांकाला कोणत्याच प्रकारचा धक्का बसणार नाही. तसेच या मालिकेचा निर्णय काही जरी लागला तरी वेस्ट इंडिजचा संघ आठव्या क्रमांकावरच राहील. 

तर दुसऱ्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या संघात कसोटी मालिकेला २४ जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया संघ १०१ अंकांसह ५ पाचव्या तर श्रीलंका ९१ अंकासह ६ व्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे या मालिकेत विजय मिळवण्याचा दोन्ही संघाचा मानस असेल. तसेच या मालिकेचा निर्णय काहीही लागला तरी या दोन्ही संघाला विशेष असा काही परिणाम होणार नाही. निर्णय काही जरी आला तरी सद्य परिस्थिीतत हे संघ ज्या क्रमांकावर आहेत, त्याच क्रमांकावर राहतील.

 ऑस्ट्रेलियाने या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० जरी निर्विवाद विजय मिळवला, तर ऑस्ट्रेलियाच्या अंकात तीनने वाढ होऊन एकूण अंक १०४ होतील. तसेच असे झाल्यास श्रीलंकेला दोन अंकांचे नुकसान होईल आणि त्यांचे अंक ८९ इतके होतील. तसेच श्रीलंकेने या मालिेकेत  २-० असा विजय मिळवला तर त्यांचे एकूण ९५ गुण होतील. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेत केवळ २ अंकांचा फरक राहील.