श्रीलंकेविरुद्धची मॅच ड्रॉ, तरी भारताची विश्वविक्रमशी बरोबरी

भारताविरुद्धची तिसरी टेस्ट मॅच ड्रॉ करण्यामध्ये श्रीलंकेला यश आलं आहे. 

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 6, 2017, 06:09 PM IST
श्रीलंकेविरुद्धची मॅच ड्रॉ, तरी भारताची विश्वविक्रमशी बरोबरी  title=

दिल्ली : भारताविरुद्धची तिसरी टेस्ट मॅच ड्रॉ करण्यामध्ये श्रीलंकेला यश आलं आहे. श्रीलंकेनं मॅच ड्रॉ केली असली तरी सीरिज मात्र भारतानं 1-0नं खिशात टाकली आहे.

कोलकत्यामध्ये झालेली पहिली टेस्ट मॅच ड्रॉ झाली होती. त्यानंतर नागपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं विजय मिळवला होता.

विश्वविक्रमशी बरोबरी

सीरिज जिंकल्याबरोबरच भारतानं ऑस्ट्रेलियानं केलेल्या विश्वविक्रमशी बरोबरी केली आहे. श्रीलंकेला नमवल्यामुळे भारतानं लागोपाठ 9 सीरिज जिंकल्या आहेत. याआधी २००५ ते २००८मध्ये ऑस्ट्रेलियानं हा रेकॉर्ड केला होता. यानंतर आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारत टेस्ट खेळणार आहे. या दौऱ्यावेळी ऑस्ट्रेलियाचं रेकॉर्ड तोडण्याची संधी भारताला उपलब्ध आहे.

2015 पासून भारत अजिंक्य

2015 साली भारतानं श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानावर २-१नं हरवलं. तेव्हापासून भारतानं लागोपाठ 9 सीरिज जिंकल्या आहेत. भारतानं दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, बांग्लादेशला घरच्या मैदानात लोळवलं तर वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या मैदानात धूळ चारली.

2017 मध्ये भारतानं पुन्हा एकदा श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानात 3-0नं व्हाईट वॉश केलं आणि आता भारतानं पुन्हा एकदा लंकेलाच 1-0नं मात दिली.

तर आफ्रिकेत विराटचंही रेकॉर्ड होणार

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताचा विजय झाला तर लागोपाठ 10 सीरिज जिंकण्याचा रेकॉर्ड भारत करेल. याचबरोबर विराट कोहली भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार बनेल.

धोनी हा भारताचा सगळ्यात यशस्वी टेस्ट कॅप्टन आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं 60 टेस्ट मॅचमध्ये 27 विजय मिळवले आहेत. तर गांगुलीच्या नेतृत्वात भारताला 49 मॅचमध्ये 21 विजय मिळाले.

कोहलीच्या नेतृत्वात भारतानं आत्तापर्यंत 32 टेस्टपैकी 20 टेस्टमध्ये विजय मिळवला आहे.

भारताचे यशस्वी कॅप्टन

एम.एस.धोनी- 60 मॅचमध्ये 27 विजय, 18 पराभव

सौरव गांगुली- 49 मॅचमध्ये 21 विजय, 13 पराभव

विराट कोहली- 32 मॅचमध्ये 20 विजय, ३ पराभव

मोहम्मद अजहरुद्दीन- 47 मॅचमध्ये 14 विजय, 14 पराभव

सुनील गावसकर- 47 मॅचमध्ये 9 विजय, 8 पराभव

मन्सुर अली खान पतौडी- 40 मॅचमध्ये 9 विजय, 19 पराभव