भारत-इंग्लंड दुसरी टेस्ट : पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द

पावसामुळे भारत आणि इंग्लंडमधल्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.

Updated: Aug 9, 2018, 09:58 PM IST
भारत-इंग्लंड दुसरी टेस्ट : पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द title=

लंडन : पावसामुळे भारत आणि इंग्लंडमधल्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ही मॅच खेळवण्यात येत आहे. पण पहिल्या दिवसाचा खेळ फुकट गेल्यामुळे क्रिकेट रसिकांची निराशा झाली. आता उद्या म्हणजेच दुसऱ्या दिवशी टॉस पडेल आणि मॅचला सुरुवात होईल. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पाऊस पडणार नाही. पण पाचव्या दिवशी मात्र पाऊस पडेल, असा अंदाज इंग्लंडमधल्या वेधशाळेनं वर्तवला आहे. त्यामुळे उद्यापासून खेळामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही अशी अपेक्षा आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा फक्त ३१ रननी पराभव झाला. विराट कोहलीनं पहिल्या इनिंगमध्ये १४९ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ५१ रनची खेळी केली. पण विराटला कोणत्याही बॅट्समननं साथ न दिल्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी भारतीय टीम उतरेल. पण भारतीय टीमच्या या निर्धारावर पहिल्याच दिवशी पावसानं पाणी फिरवलं आहे.

भारतीय टीमची यादी लिक

दुसऱ्या टेस्ट मॅचचा टॉस पडला नाही तरी भारतीय टीमची यादी सोशल नेटवर्किंगवर लीक झाली आहे. लीक झालेल्या या टीममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण ही खरंच दुसऱ्या टेस्टसाठी खेळणारी टीम आहे का नाही याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही. टॉस पडण्याच्या आधी दोन्ही टीमचे कर्णधार अंपायर आणि मॅच रेफ्रीकडे टीमची यादी देतात.

पहिल्या मॅचमध्ये विराट वगळता सगळे भारतीय बॅट्समन अपयशी ठरले. त्यामुळे या टेस्ट मॅचसाठी भारतीय टीममध्ये बदल करण्यात येतील, असं बोललं जात होतं. दुसऱ्या टेस्टमध्ये शिखर धवनऐवजी चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादवऐवजी कुलदीप यादव किंवा रवींद्र जडेजाला संधी मिळेल, अशी चर्चा होती. पण लिक झालेली ही टीम खरी असेल तर मात्र पुजारा आणि दुसऱ्या स्पिनरला या मॅचमध्येही संधी मिळालेली नाही, असं म्हणावं लागेल.