तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे.

Updated: Aug 22, 2018, 03:59 PM IST
तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय title=

नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे. भारतानं ठेवलेल्या ५२१ रनचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ३१७ रनवर ऑल आऊट झाला यामुळे भारताचा तब्बल २०३ रननी विजय झाला आहे. पाचव्या दिवसाची सुरुवात इंग्लंडनं ३११-९ अशी केली होती. पण पाचव्या दिवसाच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये अश्विननं अंडरसनला आऊट केलं आणि भारतानं सामना खिशात टाकला.

इंग्लंडला ५२१ रनचं आव्हान ठेवल्यानंतर भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. तर ईशांत शर्माला २ आणि मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि अश्विनला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

या मॅचमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. भारतानं पहिल्या इनिंगमध्ये ३२९ रन केले. विराट कोहलीनं ९७ रन आणि अजिंक्य रहाणेनं ८१ रन करत भारताला सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवलं.

यानंतर बॅटिंगला आलेल्या इंग्लंडचा डाव १६१ रनवर ऑल आऊट झाल्यामुळे भारताला १६८ रनची आघाडी मिळाली. हार्दिक पांड्यानं झंझावती बॉलिंग करत इंग्लंडच्या ५ बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पांड्यानं फक्त ६ ओव्हरमध्येच इंग्लंडच्या ५ विकेट घेतल्या.

इंग्लंडला ऑल आऊट केल्यानंतर भारतीय बॅट्समननी पुन्हा मोठी धावसंख्या उभारली. पहिल्या इनिंगमध्ये ३ रननी शतक हुकलेल्या विराट कोहलीनं दुसऱ्या इनिंगमध्ये १०३ रनची खेळी केली. तर चेतेश्वर पुजारानं ७२ रन केले. बॉलिंगवेळी इंग्लंडच्या ५ विकेट घेणाऱ्या हार्दिक पांड्यानं बॅटिंग करताना ५२ बॉलमध्ये नाबाद ५२ रनची खेळी केली. यानंतर भारतानं ३५२-७वर डाव घोषित केला. यामुळे इंग्लंडला विजयासाठी ५२१ रनचं आव्हान मिळालं.

इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमधल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी तर दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला होता. आता तिसरी टेस्ट जिंकत भारतानं सीरिजमध्ये २-१ असं कमबॅक केलं आहे. इंग्लंडविरुद्धची चौथी टेस्ट मॅच ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे.