पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का, तापामुळे राहुल बाहेर

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का बसला आहे.

Updated: Jul 24, 2017, 05:07 PM IST
पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का, तापामुळे राहुल बाहेर title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनर के.एल.राहुलला ताप आल्यामुळे त्याला पहिल्या टेस्टला मुकावं लागणार आहे. २६ जुलैपासून टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट सुरु होत आहे.

तापामुळे राहुल सोमवारी गेलच्या मैदानातही सरावासाठी आला नाही. राहुलचा ताप गंभीर नसून आराम म्हणून त्याला पहिली टेस्ट खेळता येणार नसल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे. श्रीलंकेत दाखल झाल्यानंतरच्या सराव सामन्यामध्ये राहुलनं अर्धशतक झळकावलं होतं.

तीन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टवेळी दुखापत झाल्यामुळे राहुल आयपीएल, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वेस्ट इंडिज दौऱ्यातही नव्हता. आता पहिल्या टेस्टमध्ये राहुलऐवजी अभिनव मुकुंद आणि शिखर धवन ओपनिंग करतील.

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी मुरली विजयचीही निवड करण्यात आली होती. पण मनगटाची दुखापत बरी झाली नाही म्हणून शेवटच्या क्षणी त्यानं या दौऱ्यातून माघार घेतली. त्यामुळे मुरली विजयऐवजी शिखर धवनला संधी देण्यात आली आहे.