धक्कादायक! #MeToo विषयी 'या' खेळाडूचा धक्कादायक खुलासा

त्या व्यक्तीमुळेच मी खेळणंही सोडलं....

Updated: Oct 10, 2018, 12:21 PM IST
धक्कादायक! #MeToo विषयी 'या' खेळाडूचा धक्कादायक खुलासा  title=

मुंबई: सोशल मीडिया, कलाविश्व, राजकीय वर्तुळानंतर आता क्रीडाविश्वातही #MeToo चे वारे वाहू लागले आहेत. हॉलिवूडपासून सुरु झालेल्या या चळवळीने सध्याच्या घडीला भारतात चांगलाच जोर धरला असून अनेक महिला खुलेपणाने त्यांनी सामना केलेल्या अशा प्रसंगांविषयी बोलत आहेत, ज्याविषयी त्यांनी बरीच वर्षे मौन बाळगलं होतं. 

एकिकडे कलाविश्वातून लैंगिक शोषणाच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता क्रीडा जगतातही याची सुरुवात झाल्याचं स्पष्ट होत आहे. 

राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने ट्विटरच्या माध्यमातून आपणही अशा शोषणाला बळी पडल्याचं म्हणत आपलं एक प्रकारे मानसिक शोषण झालं होतं, असं स्पष्ट केलं आहे. 

खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करुनही ज्वालाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. इतकच नव्हे तर तिला राष्ट्रीय बॅडमिंटन संघातूनही वगळण्यात आलं होतं. 

हे सारं कृत्य कोणी केलं, त्या व्यक्तीचं नाव तिने नमूद केलेलं नाही. पण, त्या व्यक्तीने आपल्या कुटुंबियांनाही धमकावलं होतं, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

आपण खेळापासून दुरावण्यामागे 'त्या' एका व्यक्तीचा हात असल्याचं म्हणत तिने हा अनुभव सांगितला. मुख्य म्हणजे एक खेळाडू म्हणून या सर्व गोष्टी ज्वालाच्या आत्मविश्वासालाही काही बाबतीत धक्का देऊन गेल्या होत्या. 

काय आहेत ज्वालाचे आरोप?

२००६ मध्ये मुख्य पदावर त्या व्यक्तीची नियुक्ती झाली त्यावेळी खेळात चांगलं प्रदर्शन करुनही मला राष्ट्रीय संघातून वगळण्यात आलं होतं. रिओवरुन परत आले तेव्हाही मला राष्ट्रीय संघातून वगळण्यात आलं. ज्यानंतर मी खेळणंच सोडून दिलं, असं तिने ट्विट करत म्हटलं आहे. 

ज्वालाने कोणाचं नाव इथे स्पष्ट केलं नसलं तरीही तिचं हे ट्विट बॅडमिंटन असोसिएशनच्या तत्कालीन अध्यक्षांनाच उद्देशून असल्याच्या चर्चांनी आता डोकं वर काढलं आहे.