हे खेळाडू मुंबईच्या पराभवाला जबाबदार- सुनील गावसकर

यंदाच्या टी-20 मोसमामध्ये मुंबईला अजून एकही मॅच जिंकता आलेली नाही.

Updated: Apr 17, 2018, 09:06 PM IST
हे खेळाडू मुंबईच्या पराभवाला जबाबदार- सुनील गावसकर title=

मुंबई : यंदाच्या टी-20 मोसमामध्ये मुंबईला अजून एकही मॅच जिंकता आलेली नाही. याबद्दल माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी एका वृत्तपत्रामध्ये स्तंभ लिहिला आहे. प्रत्येक वर्षी मुंबईची सुरुवात धीमीच असते. पण पॉईंट्स टेबलमध्ये पहिले पॉईंट्स मिळवण्यासाठी रोहितची टीम चिंतेत असेल कारण हीच एक टीम सध्या शून्य पॉईंटवर आहे, असं गावसकर म्हणाले आहेत. मुंबईच्या खेळाडूंना यापेक्षा आणखी चांगली बॅटिंग करावी लागेल. सूर्यकुमार यादवला ओपनिंगला पाठवण्याची त्यांची रणनिती यशस्वी झाली. तसंच इशान किशन आणि एविन लुईसही जलद रन बनवून टीमला २०० रन्सपर्यंत नेण्यासाठी मदत करतात, असं गावसकर म्हणाले.

मधल्या फळीमुळे पराभव

मुंबईचे सुरुवातीचे बॅट्समन चांगले खेळत असले तरी मधल्या फळीतल्या बॅट्समन ज्या पद्धतीचे शॉट खेळतात त्यामुळे मुंबईचं नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली आहे. हार्दिक पांड्या खेळत असेल तर विरुद्ध टीम स्पिनरना बॉलिंग देत नाही कारण पांड्या स्पिनरचे बॉल मैदानाबाहेर फेकतो. पांड्या बॅटिंगला असताना फास्ट बॉलरच बॉलिंग टाकतील ही दुसऱ्या कॅप्टनची रणनिती असेल, असं गावसकर म्हणाले.

हार्दिकपेक्षा कृणाल उत्तम

सुरुवातीच्या ६ ओव्हरमध्ये जेव्हा फिल्डर ३० यार्डाच्या आत असतात तेव्हा हार्दिकला बॅटिंगला पाठवलं जाऊ शकतं, असा सल्लाही गावसकर यांनी दिला आहे. कृणाल पांड्या हा त्याच्या स्पिन आणि तळाला येऊन केलेल्या फटकेबाजीमुळे हार्दिक पांड्यापेक्षा भावतो, असं गावसकर यांना वाटतं.

गावसकर कर्णधारांवर नाराज

यावर्षीच्या स्पर्धेवर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर खुश आहेत. गावसकर यांनी बॅट्समन आणि बॉलरचं कौतुक केलं आहे. तसंच यावर्षी स्पर्धेसाठी वापरण्यात येणाऱ्या खेळपट्ट्याही उच्च दर्जाच्या आहेत. या खेळपट्ट्यांवर तिन्ही फॉरमॅट खेळता येतील, असं गावसकर म्हणाले आहेत. असं असलं तरी कर्णधारांच्या वागणुकीवर गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच अंपायरची भूमिका महत्त्वाची असणार आहे, अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली आहे.

कर्णधार वेळ फुकट घालवतायत

मॅचमध्ये रणनिती ठरवण्यासाठी कर्णधार जास्तच वेळ फुकट घालवत आहेत. यामुळे २० ओव्हर वेळेत पूर्ण होत नाहीत, असं गावसकर म्हणाले आहेत. हे सांगताना गावसकर यांनी अश्विन आणि दिनेश कार्तिकची नावं घेतली आहेत. हे दोघंही पहिल्यांदाच कर्णधारपद भुषवत आहेत.

अंपायरची भूमिका महत्त्वाची

कर्णधार वेळ फुकट घालवत असताना अंपायरची भूमिका महत्त्वाचं असल्याचं गावसकर यांनी सांगितलं. कर्णधारांनी कमी वेळ फुकट घालवावा हे सांगणं अंपायरची जबाबदारी आहे. कर्णधार जी वेळ रणनिती बनवण्यासाठी वापरतो ती वेळ प्रेक्षकांच्या काहीच कामाची नसते. प्रेक्षकांना प्रत्येक क्षण मैदानातला रोमांच बघायचा असतो, असं गावसकर यांनी लिहीलं आहे.