शुक्रवारी अंधेरीत रंगणार 'मुंबई महापौर श्री'!

'मुंबई महापौर चषक क्रीडा स्पर्धा' म्हटल्या की पालिकेकडून मिळणाऱ्या महापौर निधीतून कार्यक्रम उरकण्याची स्पर्धा... पण याला काही खेळ अपवाद आहेत... यात शरीरसौष्ठव खेळाचाही समावेश करता येईल. 

Updated: Mar 14, 2018, 08:40 AM IST
शुक्रवारी अंधेरीत रंगणार 'मुंबई महापौर श्री'! title=

मुंबई : 'मुंबई महापौर चषक क्रीडा स्पर्धा' म्हटल्या की पालिकेकडून मिळणाऱ्या महापौर निधीतून कार्यक्रम उरकण्याची स्पर्धा... पण याला काही खेळ अपवाद आहेत... यात शरीरसौष्ठव खेळाचाही समावेश करता येईल. 

येत्या शुक्रवारी १६ मार्च रोजी अंधेरी पूर्वे भागातील शेर-ए-पंजाब सोसायटीत 'मुंबई महापौर श्री' शरीरसौष्ठव स्पर्धा रंगणार आहे. 'मुंबई महापौर श्री'च्या विजेत्याला रोख ५१ हजार रूपयांच्या पुरस्काराने गौरविले जाणार असून  उपविजेत्याला २१ हजार रूपयांचे रोख इनाम दिले जाईल. त्याचप्रमाणे सात गटात होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक गटामध्ये ५, ४, ३, २ आणि १ हजारांची सहा बक्षीसे दिली जातील. म्हणजेच एकंदर सात गटांत ४२ खेळाडूंना रोख इनाम दिले जाणार आहेत.  

'मिस्टर इंडिया'च्या पूर्व तयारीसाठी

येत्या २३ ते २५ मार्चला पुण्याच्या बालेवाडीत होत असलेल्या मिस्टर इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेत सर्वाधिक खेळाडू महाराष्ट्राच्या संघातून मुंबईचेच खेळणार आहेत. त्यामुळे मिस्टर इंडियाची रंगीत तालीम म्हणूनही मुंबईकर खेळाडू या स्पर्धेकडे पाहात आहेत. या स्पर्धेत दोनवेळा भारत श्री ठरलेला सुनीत जाधव, मुंबई श्री सुजन पिळणकर, अक्षय मोगरकर, अतुल आंब्रे, सकिंदर सिंग, सचिन डोंगरे आणि सागर कातुर्डेसारखे अनेक तयारीतले खेळाडू मुंबई महापौर श्री स्पर्धेच्या मंचावर आपले पीळदार स्नायू दाखवण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे यंदाची 'मुंबई महापौर श्री' रंगतदार होणार यात वाद नाही.

आर्थिक बळ वाढलं

पालिकेकडून दीड लाखांचा निधी मिळाला असतानाही 'बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन' आणि 'उपनगर बॉडीबिल्डींग आणि फिटनेस असोसिएशन'नं पाच लाखांपेक्षा अधिक आर्थिक बळ या स्पर्धेला लावून मुंबई महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेची ताकद वाढवली आहे. या स्पर्धेत सुमारे दोन लाख रूपयांची रोख बक्षीसेच खेळाडूंना दिली जाणार आहेत. त्यामुळे शरीरसौष्ठव संघटनेप्रमाणे अन्य खेळाच्या संघटनांनी मुंबई महापौर चषक स्पर्धांसाठी आपल्याकडूनही आर्थिक बळ लावून स्पर्धेचा दर्जा  उंचावण्यासाठी पुढाकार घ्यावे, असे आवाहन उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अमोल किर्तीकर यांनी केले.

या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी शरीरसौष्ठवपटूंनी अजय खानविलकर (९७६९८७९८२८) आणि सुनील शेगडे (९२२३३४८५६८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राजेश सावंत यांनी केले आहे.