टी-20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतरही भारताची पुन्हा तीच चूक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारताचा पाच विकेटनं पराभव झाला.

Updated: Feb 12, 2018, 05:42 PM IST
टी-20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतरही भारताची पुन्हा तीच चूक title=

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारताचा पाच विकेटनं पराभव झाला. ६ मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं पहिल्या तीन मॅच जिंकल्या होत्या. त्यामुळे चौथ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला असता तर सीरिज खिशात टाकण्याची ऐतिहासिक संधी होती. पण बॉलर्सच्या खराब कामगिरीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

चहलची चूक पडली महागात

२८ ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २०२ रन्सची आवश्यकता होती. रन्सचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची अवस्था १०२/४ अशी झाली होती. यानंतर लगेचच युझवेंद्र चहलनं डेव्हिड मिलरची विकेट घेतली. पण हा नो बॉल असल्यामुळे मिलरला जीवनदान मिळालं. त्यावेळी मिलर ७ रन्सवर खेळत होता. पण जीवदान मिळाल्यानंतर त्यानं २८ बॉल्समध्ये ३९ रन्सची खेळी करत दक्षिण आफ्रिकेचा विजय सोपा केला.

नो बॉलची पुन्हा तीच चूक

महत्त्वाच्या वेळी नो बॉल टाकण्याची भारतीय बॉलर्सची ही काही पहिली वेळ नाही. २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्येही जसप्रीत बुमराहनं अशीच चूक केली होती. पाकिस्तानचा बॅट्समन फकर जमान ३ रन्सवर असताना बुमराहनं जमानची विकेट घेतली, पण तो नो बॉल होता. फकर जमाननं या संधीचा फायदा घेत ११४ रन्सची खेळी केली आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा विजय झाला.

टी-20 वर्ल्ड कपमध्येही नो बॉल पडला महाग

२०१६ साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टाकलेले नो बॉलही भारताला महागात पडले होते. आर. अश्विन आणि हार्दिक पांड्यानं या मॅचमध्ये लिएन्डल सिमन्सला दोन नो बॉल टाकले. या दोन्ही नो बॉलला सिमन्स आऊट होता. सिमन्स १८ रन्सवर असताना अश्विननं तर ५० रन्सवर असताना पांड्यानं नो बॉल टाकला. या मॅचमध्ये सिमन्सनं ८२ रन्स बनवत वेस्ट इंडिजला २०१६ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचवलं.

२०१९ आधी सुधारावी लागणार चूक

२०१९च्या वर्ल्ड कपआधी भारताला नो बॉलची ही चूक सुधारावी लागणार आहे. अन्यथा नो बॉलची पुन्हा एकदा मोठी किंमत भारताला मोजावी लागू शकते.