विराट-अनुष्काच्या देशभक्तीवर सवाल उपस्थित करणाऱ्यांना गंभीरचे उत्तर

कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या इटलीतील लग्नावरुन काही जण टीका करत असताना सलामीवीर गौतम गंभीरने त्यांना पाठिंबा दिलाय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 21, 2017, 11:14 AM IST
विराट-अनुष्काच्या देशभक्तीवर सवाल उपस्थित करणाऱ्यांना गंभीरचे उत्तर  title=

नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या इटलीतील लग्नावरुन काही जण टीका करत असताना सलामीवीर गौतम गंभीरने त्यांना पाठिंबा दिलाय.

विराट आणि अनुष्काने इटलीत जाऊन लग्न केले. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले. इटलीमध्ये या जोडप्याने लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर विराट आणि अनुष्काच्या देशभक्तीवरुन अनेक लोक सवाल उपस्थित करतायत. अनेक भाजप नेत्यांनी यावरुन टीकाही केली. 

या दरम्यान, भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने मात्र विराट-अनुष्काची पाठराखण केलीये. एखाद्याच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ नको असा सल्ला त्याने या नेत्यांना दिलाय.

गंभीरने एका न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले, हा त्यांचा खासगी निर्णय आहे आणि कोणीच यावर आपली प्रतिक्रिया देऊ नये. नेत्यांनी या प्रकरणी बोलताना अधिक काळजी घेतली पाहिजे. 

गुनाचे भाजप आमदार पन्नालाल शाक्य यांनी विराट-अनुष्काच्या परदेशात जाऊन लग्न करण्यावर सवाल उपस्थित केला होता. ते म्हणाले होते, विराटने भारतात पैसा कमावला आणि परदेशात विवाहासाठी गेले. त्यांना आपल्या देशात जागाच मिळाली नाही का?  शाक्य इतक्यावरच थांबले नाहीत तर भगवान राम, कृष्ण, विक्रमादित्य, युधिष्ठिर यांनी याच भूमीवर विवाह केला. तुम्हालाही येथेच लग्न करावयास हवे होते. आमच्यातील कोणीच लग्नासाठी परदेशात जात नाहीत. कोहलीने येथे पैसा कमावला आणि तेथे अब्जावधी खर्च केले. देशासाठी कोणताच सन्मान नाही. यावरुन ते देशभक्त नसल्याचे सिद्ध होते.