पाकिस्तानचा यासिर शाह विश्वविक्रमापासून १ विकेट दूर

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये अजहर अली आणि असद शफीकच्या शतकांमुळे पाकिस्तान मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Updated: Dec 5, 2018, 09:19 PM IST
पाकिस्तानचा यासिर शाह विश्वविक्रमापासून १ विकेट दूर title=

अबुधाबी : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये अजहर अली आणि असद शफीकच्या शतकांमुळे पाकिस्तान मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. पाकिस्ताननं मॅचच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या इनिंगमध्ये ३४८ रन केले. त्याआधी न्यूझीलंडची पहिली इनिंग २७४ रनवर संपुष्टात आली. पाकिस्तानला पहिल्या इनिंगमध्ये ७४ रनची आघाडी मिळाली. ३ टेस्ट मॅचची ही सीरिज १-१नं बरोबरीत आहे.

पाकिस्ताननं तिसऱ्या दिवसाची सुरुवात ३ विकेटवर १३९ रन अशी केली. अजहर अलीनं १३४ आणि असद शफीकनं १०४ रनची खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २०१ रनची पार्टनरशीप केली. हे दोघं खेळत असताना पाकिस्तानची अवस्था २८६/३ अशी होती. पण ही पार्टनरशीप तुटल्यानंतर पाकिस्तानची बॅटिंग गडगडली. पाकिस्तानच्या शेवटच्या ७ विकेट ६२ रनवर गेल्या. न्यूझीलंडकडून पहिलीच टेस्ट मॅच खेळणाऱ्या ऑफ स्पिनर विल सोमरविलेनं ७५ रन देऊन ४ विकेट घेतल्या. फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्ट आणि डावखुरा स्पिनर एजाज पटेलला प्रत्येकी २-२ विकेट घेण्यात यश आलं.

अजहर अलीचं १५वं शतक

अजहर अलीनं फास्ट बॉलर कॉलीन डि ग्रॅण्डहोमच्या बॉलिंगवर फोर मारून त्याचं १५वं टेस्ट शतक पूर्ण केलं. मे २०१७नंतर त्याचं हे पहिलं शतक आहे. तर असद शफीकनं सोमरविलेच्या बॉलिंगवर एक रन काढून त्याचं १२वं शतक पूर्ण केलं. अजहरच्या २९७ बॉलच्या खेळीमध्ये १२ फोर आणि शफीकच्या २५९ बॉलच्या खेळीमध्ये १४ फोरचा समावेश होता.

केन विलियमसनकडून न्यूझीलंडला अपेक्षा

न्यूझीलंडच्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात चांगली झाली नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडचा स्कोअर २६/२ एवढा झाला होता. अजूनही न्यूझीलंड पाकिस्तानपेक्षा ४८ रननी पिछाडीवर आहे. न्यूझीलंडला आता त्यांचा कर्णधार केन विलियमसनकडून अपेक्षा आहेत. विलियमसन १४ रनवर नाबाद खेळत आहे. फास्ट बॉलर शाहीन शाह आफ्रिदीनं जीव रावलला शून्य रनवर एलबीडब्ल्यू केलं. तर लेग स्पिनर यासिर शाहनं टॉम लेथमची विकेट घेतली.

यासिर शाह विश्वविक्रमापासून १ विकेट दूर

पाकिस्तानचा लेग स्पिनर यासिर शाहनं न्यूझीलंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये एक विकेट घेतली. याचबरोबर त्याच्या टेस्ट क्रिकेटमधल्या विकेटची संख्या १९९ एवढी झाली आहे. ३३वी टेस्ट मॅच खेळणाऱ्या यासिर शाहला सगळ्यात जलद २०० विकेट पूर्ण करायला आता फक्त एका विकेटची गरज आहे. सध्या हे रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी ग्रिमेट यांच्या नावावर आहे. ग्रिमेट यांनी ३६ टेस्ट मॅचमध्ये २०० विकेटचा विक्रम केला होता.