कृष्णप्पा गौतमचा ३०० चा स्ट्राईक रेट, राजस्थाननं उडवला मुंबईचा धुव्वा

कृष्णप्पा गौतमच्या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थाननं मुंबईचा पराभव केला आहे.

Updated: Apr 23, 2018, 12:06 AM IST
कृष्णप्पा गौतमचा ३०० चा स्ट्राईक रेट, राजस्थाननं उडवला मुंबईचा धुव्वा title=
सौजन्य : आयपीएल

जयपूर : कृष्णप्पा गौतमच्या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थाननं मुंबईचा पराभव केला आहे. शेवटच्या २ ओव्हरमध्ये २८ रनची आवश्यकता असताना राजस्थाननं २ बॉल राखून विजय मिळवला. कृष्णप्पा गौतमनं ११ बॉलमध्ये ३३ रनची खेळी केली. यामध्ये ४ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. सुरुवातीला राजस्थानला १४ बॉलमध्ये ३८ तर १२ बॉलमध्ये २८ रनची आवश्यकता असताना १९वी ओव्हर बुमराहनं टाकली. बुमराहच्या या ओव्हरला राजस्थाननं १८ रन काढल्या. यानंतर शेवटच्या ओव्हरला १० रनची आवश्यकता असताना गौतमनं हार्दिक पांड्याच्या दुसऱ्या बॉलला फोर आणि चौथ्या बॉलला सिक्स लगावली आणि राजस्थानला मॅच जिंकवून दिली.

राजस्थानला सुरुवातीला धक्के

मुंबईनं ठेवलेल्या १६८ रनचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. राजस्थानचा स्कोअर १४ असताना राहुल त्रिपाठी आणि ३८ असताना अजिंक्य रहाणे आऊट झाला. यानंतर संजू सॅमसन आणि बेन स्टोक्सनं राजस्थानचा डाव सावरला. सॅमसननं ३९ बॉलमध्ये ५२ आणि स्टोक्सनं २७ बॉलमध्ये ४० रन केल्या. या दोघांची विकेट गेल्यानंतर राजस्थानच्या पडझडीला सुरुवात झाली पण गौतमनं मुंबईच्या हातातला विजय खेचून आणला. मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर मॅकलेनघन, कृणाल पांड्या आणि मुस्तफिजूरला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

किशन-सूर्यकुमारची अर्धशतकं

त्याआधी मुंबईनं या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण मुंबईची सुरुवातही खराब झाली. स्कोअरबोर्डवर एक रन असताना एव्हिन लुईस आऊट झाला. पण त्यानंतर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवनं अर्धशतकं झळकावली आणि मुंबईच्या डावाला आकार दिला. सूर्यकुमारनं ४७ बॉलमध्ये ७२ आणि ईशान किशननं ४२ बॉलमध्ये ५८ रन केल्या. पण या दोघांची विकेट गेल्यानंतर मुंबईच्या बॅट्समनना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. आयपीएलची पहिलीच मॅच खेळणाऱ्या जोफ्रा आर्चरनं मुंबईच्या तीन विकेट घेतल्या तर धवल कुलकर्णीला २ आणि जयदेव उनाडकटला १ विकेट मिळाली.