तर पुढच्या आयपीएलमध्ये होणार हे मोठे बदल

आयपीएलच्या पुढच्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन्ही टीम कमबॅक करणार आहेत.

Updated: Aug 21, 2017, 06:50 PM IST
तर पुढच्या आयपीएलमध्ये होणार हे मोठे बदल title=

मुंबई : आयपीएलच्या पुढच्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन्ही टीम कमबॅक करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं या दोन्ही टीमवर घातलेल्या बंदीचा कालावधी संपल्यानंतर या टीम पुनरागमन करतील, पण आता आयपीएलच्या टीममध्ये मोठे बदल दिसू शकतात.

राजस्थान रॉयल्स या फ्रॅन्चायजीनं त्यांच्या कंपनीचं नाव बदलण्याबाबत बीसीसीआयला विनंती केली आहे. याबाबतचं कारण मात्र राजस्थान रॉयल्सनं सांगितलेलं नाही. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी राजस्थान आणि चेन्नईच्या टीमवर बंदी घालण्यात आली होती. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी झालेली बदनामी बघता राजस्थान रॉयल्सनं हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे.

राजस्थान क्रिकेट असोसिएशनवर बीसीसीआयनं बंदी घातल्यामुळे राजस्थान टीमचं घरचं मैदानही बदलू शकतं. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी राजस्थान क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बीसीसीआयनं असोसिएशनवर बंदी घातली.

राजस्थानबरोबरच किंग्ज इलेव्हन पंजाबनंही त्यांचं घरचं मैदान असलेलं मोहाली बदलण्याची मागणी केली आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशन आणि स्थानिक सुविधांबाबत किंग्ज इलेव्हन पंजाब नाराज असल्यामुळे त्यांनी बीसीसीआयकडे ही विनंती केली आहे.

राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन्ही टीमची विनंती बीसीसीआयनं मान्य केली तर येणाऱ्या आयपीएलमध्ये या दोन्ही टीम नव्या मैदानात आणि नव्या शहरांचं नाव घेऊन खेळू शकतात.