ऍडलेड टेस्टमध्ये विश्वविक्रम करणाऱ्या पंतकडून यशाचं श्रेय धोनीला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला. 

Updated: Dec 12, 2018, 11:28 PM IST
ऍडलेड टेस्टमध्ये विश्वविक्रम करणाऱ्या पंतकडून यशाचं श्रेय धोनीला title=

पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला. पहिल्या इनिंगमध्ये शतक आणि दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक करणारा चेतेश्वर पुजारा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पण या मॅचमध्ये भारताचा विकेट कीपर ऋषभ पंतनं विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे. ऋषभ पंतनं या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ६ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ५ असे एकूण ११ कॅच घेतले. याआधी जॅक रसेल यांनी १९९५ साली इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये आणि एबी डिव्हिलियर्सनं २०१३ साली दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचमध्ये ११ कॅच घेतले होते.

भारताकडून सर्वाधिक कॅच घेणाच्या विक्रम याआधी ऋद्धीमान सहाच्या नावावर होता. पंतनं २०१८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये १० कॅच घेतले होते. बॉब टेलर आणि ऍडम गिलख्रिस्ट यांच्या नावावरही १० कॅचचं रेकॉर्ड आहे.

भारतासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कॅच घेण्याचं रेकॉर्ड याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होतं. २०१४ साली मेलबर्नमध्ये धोनीनं ९ कॅच घेतले होते.

ऋषभ पंतनं त्याच्या पहिल्याच टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ५ कॅच पकडण्याचं रेकॉर्डही केलं होतं. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये हे रेकॉर्ड करणारा पंत पहिला भारतीय आहे. यावर्षी नॉटिंगहम टेस्टमध्ये पंतनं हे रेकॉर्ड केलं होतं.

ऍडलेड टेस्टमध्ये विश्वविक्रमाला गवसणी घालणाऱ्या ऋषभ पंतनं त्याच्या यशाचं श्रेय धोनीला दिलं आहे. धोनीनं मला संयम ठेवायला आणि तणावाच्या परिस्थितीतं कसं वागायचं हे शिकवलं असल्याचं पंत म्हणाला. तसंच धोनी हाच देशाचा हिरो असल्याची प्रतिक्रिया पंतनं दिली. धोनी जेव्हा आजूबाजूला असतो तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. मला कोणतीही अडचण असेल तर मी धोनीला फोन करतो. धोनी मला नेहमी या अडचणींवर उपाय सांगतो, असं वक्तव्य ऋषभ पंतनं केलं.