भारतीय टीमच्या त्या निर्णयामुळे निवड समिती नाराज

आशिया कपमध्ये भारतीय टीमनं घेतलेल्या निर्णयावरून निवड समिती चांगलीच नाराज झाल्याचं वृत्त आहे.

Updated: Oct 9, 2018, 09:19 PM IST
भारतीय टीमच्या त्या निर्णयामुळे निवड समिती नाराज  title=

मुंबई : आशिया कपमध्ये भारतीय टीमनं घेतलेल्या निर्णयावरून निवड समिती चांगलीच नाराज झाल्याचं वृत्त आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं टीममध्ये ५ बदल केले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शिखर धवन या मॅचमध्ये खेळले नाहीत. त्यामुळे धोनीकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं. तर भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहलाही या मॅचमध्ये विश्रांती देण्यात आली. मनिष पांडे, सिद्धार्थ कौल, दीपक चहर आणि खलील अहमद या मॅचमध्ये खेळले.

भारतीय टीममध्ये अशाप्रकारो होलसेल बदल केल्याचं निवड समितीला खटकलं आहे. कर्णधार आणि उपकर्णधाराला विश्रांती देऊन अचानक धोनीकडे नेतृत्व का देण्यात आलं असा प्रश्न निवड समिती सदस्यांना पडला आहे. बीसीसीआयच्या बैठकीमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

कर्णधार म्हणून धोनीची ही २००वी मॅच होती. भारत आणि अफगाणिस्तानमधली ही मॅच टाय झाली. अफगाणिस्ताननं या मॅचमध्ये ५० ओव्हरमध्ये २५२/८ एवढा स्कोअर केला. शेवटचे २ बॉल बाकी असताना भारताला विजयासाठी एका रनची गरज होती. पण रविंद्र जडेजाची विकेट गेल्यामुळे भारत ऑल आऊट झाला आणि ही मॅच टाय झाली. २०१८ सालच्या आशिया कप फायनलमध्ये भारतानं बांगलादेशचा पराभव केला. यंदाच्या स्पर्धेमध्ये भारताचा एकाही मॅचमध्ये पराभव झाला नाही.

का होतायत एकसारखे वाद?

गेल्या काही दिवसांपासून निवड समिती आणि खेळाडूंमधले वाद समोर यायला लागले आहेत. टीममधून डच्चू देताना आम्हाला सांगण्यात आलं नसल्याचा आरोप मुरली विजय आणि करुण नायर यांनी केला. 

करुण नायर आणि मुरली विजयनं निवड समितीवर संवाद न साधल्याचा आरोप केला होता. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी या आरोपांचं खंडन केलं होतं.

करुण नायरला इंग्लंडमध्ये पाचपैकी एकाही टेस्ट मॅचमध्ये संधी देण्यात आली नव्हती. तर मुरली विजयला पहिल्या तीन टेस्ट मॅचनंतर डच्चू देण्यात आला होता. यानंतर मुरली विजय एसेक्सकडून काऊंटीच्या तीन मॅच खेळला.

इंग्लंड दौऱ्यातल्या पाचही टेस्टमध्ये करुण नायरला संधी मिळाली नाही. शेवटच्या टेस्टमध्ये तर करुण नायरऐवजी हनुमा विहारीला टीममध्ये स्थान मिळालं. इंग्लंड दौऱ्यानंतर करुण नायरनं क्रिकबझला मुलाखत दिली. कोणत्याही व्यक्तीला हे सहन करणं कठीण आहे. एक व्यक्ती अशा स्थितीला सांभाळू शकत नाही. टीम व्यवस्थापन आणि इतरांनी हा निर्णय घेतला, त्यामुळे मला हे स्विकारावं लागलं. मी यामध्ये काहीही करू शकत नाही. पण मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी बॅटनंच उत्तर देईन, असं नायर म्हणाला.

मुरली विजयनं निवड समितीवर निशाणा साधला. टीममधून डच्चू मिळाल्यानंतर टीम व्यवस्थानानं माझ्याशी चर्चाही केली नाही. टीममधून बाहेर काढतानाही माझ्यासोबत चर्चा झाली नाही. निवड समिती अध्यक्ष किंवा टीमशी जोडल्या गेलेल्या कोणत्याही व्यक्तीनं माझ्याशी संवाद साधला नाही, असं वक्तव्य मुरली विजयनं मुंबई मिररशी बोलताना केलं. 

विराट-शिखर-रोहितच्या पत्नींमध्येही वाद?

भारतीय टीममध्ये सध्या वाद सुरु असल्याच्या चर्चा आहेत. इंग्लंड दौऱ्यादरम्यान विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि शिखर धवनची ​पत्नी आयशा यांच्यात वाद झाला. यानंतरच शिखर धवनला टीममधून बाहेर केल्याची देखील चर्चा आहे.

ए​​का रिपोर्टनुसार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचा रोहित शर्माची पत्नी ऋतिका सजदेह आणि शिखरची पत्नी आयशा मुखर्जीसोबत वाद सुरु आहे. यामुळेच धवन आणि रोहित शर्माचा इंडिज विरुद्ध सिरीजसाठी संघात समावेश न केल्याचं देखील बोललं जात आहे. पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अनुष्काने इंग्लंड दौऱ्यावर आयशा आणि तिच्या परिवाराबाबत काही तरी वक्तव्य केल्यामुळे हा वाद सुरु झाल्याचं बोललं जात आहे. ही गोष्ट इतर खेळाडूंच्या कानावर देखील गेली. त्यानंतरच शिखर धवनला संघातून बाहेर केल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.