भारतातल्या क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार, बीसीसीआयची बैठक

भारतामध्ये होणाऱ्या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण बदल व्हायची शक्यता आहे.

Updated: Mar 13, 2018, 04:58 PM IST
भारतातल्या क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार, बीसीसीआयची बैठक  title=

मुंबई : भारतामध्ये होणाऱ्या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण बदल व्हायची शक्यता आहे. भारतात होणाऱ्या मर्यादित ओव्हरच्या मॅचमध्ये कुकाबुरा बॉलच्याऐवजी एसजी बॉल वापरण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. भारतातले प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारे कॅप्टन आणि प्रशिक्षकांची बैठक मुंबईत झाली. या बैठकीमध्ये मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये एसजीचा पांढरा बॉल वापरण्याबाबत चर्चा झाली. यंदाच्या मोसमात झालेल्या खराब अंपायरिंगचा मुद्दाही या बैठकीत उपस्थित करण्यात आला.

भारतामध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेट एसजीच्या लाल बॉलनी खेळलं जातं. तर मर्यादित ओव्हरच्या मॅच कुकाबुराच्या पांढऱ्या बॉलनं खेळवल्या जातात. मुश्ताक अली टी-20 स्पर्धा आणि विजय हजारे स्पर्धेमध्ये एसजी बॉल वापरण्यात आला होता. मुश्ताक अली स्पर्धेदरम्यान हा बॉल वापरल्यानंतर याचा फिडबॅक फारसा चांगला आला नाही. पण विजय हजारे ट्रॉफीमध्ये एसजी बॉल वापरल्यामुळे खेळाडू बॉलच्या गुणवत्तेवर खुश होते. त्यामुळे पुढच्या मोसमात भारतीय टीम वनडे आणि टी-20 मध्ये एसजीच्या पांढऱ्या बॉलनं खेळू शकते.

एसजी कुकाबुरा बॉलमध्ये फरक काय?

एसजी बॉलची सीम ही वरच्या बाजूला असते. तर कुकाबुराची सीम आतल्या बाजूला असते. कुकाबुरा बॉल मशीननं बनवला जातो, तर एसजी बॉल हातानं बनवला जातो. सगळ्या एसजी बॉलच्या आकारामध्ये थोडा फरक असतो पण कुकाबुरा बॉल एकाच आकाराचा असतो.

अंपायरच्या खराब कामगिरीवरही चर्चा

मुंबईत झालेल्या या बैठकीमध्ये अंपायरच्या खराब कामगिरीवरही चर्चा झाली. अनेक कॅप्टन आणि प्रशिक्षकांनी अंपायरची तक्रार केल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. यंदाच्या मोसमामध्ये अंपायरनी अनेक वादग्रस्त निर्णय दिले होते.

आयसीसीच्या एलीट पॅनलमध्ये सुंदरम रवी हे एकच अंपायर आहेत. यावरून भारतातल्या अंपायरच्या गुणवत्तेचा अंदाज येऊ शकतो. काही प्रशिक्षकांनी तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डीआरएस वापरण्याची विनंती केली, पण ही मागणी फेटाळण्यात आली.