मुंबईमध्ये शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या

मुंबईमध्ये शिवसेनेच्या माजी उपशाखा प्रमुखावर गोळीबार करण्यात आला आहे.

Updated: Apr 23, 2018, 05:02 PM IST
मुंबईमध्ये शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या  title=

मुंबई : मुंबईमध्ये शिवसेनेच्या माजी उपशाखा प्रमुखावर गोळीबार करण्यात आला आहे. सचिन सावंत असं त्यांचं नाव आहे. या हल्ल्यामध्ये सचिन सावंत यांचा मृत्यू झाला आहे. मालाडच्या कुरार भागात ही घटना घडली आहे. हल्ल्याचं कारणं अजूनही अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. सचिन सावंत हे मुंबईतल्या मालाडमधले शाखा क्रमांक ३९ चे माजी उपशाखा प्रमुख होते.

कसा झाला हल्ला?

रविवारी रात्री सावंत घरी जात असताना दोघांनी त्यांना भाऊ म्हणून हाक मारली. यानंतर सावंत यांनी त्यांची बाईक थांबवली. काही सांगण्याच्या बहाण्यानं एक इसम त्यांच्या जवळ आला आणि त्यानं सावंत यांच्या छातीत गोळी झाडली आणि पसार झाला, अशी माहिती मिळत आहे. या हल्ल्यानंतर सावंत यांना लगेच शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात त्यांना ८ वाजून ४० मिनिटांनी मृत घोषीत करण्यात आलं. २००९ साली सुद्धा सावंत यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

चौथ्या शिवसैनिकाची हत्या

गेल्या काही दिवसांमधली शिवसैनिकाची ही चौथी हत्या आहे. काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये पोटनिवडणुकीच्या वादातून दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती तर काल भिवंडीमध्ये शिवसेनेचे संघटक शैलेश निमसे यांचा मृतदेह सापडला होता. देवचोले गावानजिक अर्धवट जळलेल्या अवस्थेतला शैलेश निमसे यांचा हा मृतदेह होता. शहापूर तालुक्यातल्या आगाई गावात शैलेश निमसे राहत होते. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही हत्या कोणी केली याचा शोध पोलीस घेत आहेत.