प्रशिक्षकपदी रवी शास्त्री, गांगुलीची भूमिका काय?

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीची निवड झाली आहे. 

Updated: Jul 12, 2017, 06:05 PM IST
प्रशिक्षकपदी रवी शास्त्री, गांगुलीची भूमिका काय? title=

मुंबई : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीची निवड झाली आहे. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीनं रवी शास्त्रीची मुख्य प्रशिक्षकपदी तर झहीर खानची बॉलिंग प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाली आहे. राहुल द्रविड हा टीम इंडियाचा परदेश दौऱ्यावेळी बॅटिंग प्रशिक्षक असेल.

सल्लागार समितीनं या तिघांची निवड केली असली तरी रवी शास्त्रीच्या नावावर सौरव गांगुलीला आक्षेप असल्याची माहिती पीटीआयला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुरुवातीला शास्त्रीच्या नावाला गांगुलीची पसंती नव्हती पण जेव्हा झहीर खानला बॉलिंग प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आलं तेव्हा गांगुलीनंही शास्त्रीच्या नावासाठी तयार झाल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

झहीर खान हा सध्याच्या भारतीय बॉलर्सबरोबर क्रिकेट खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतानाही झहीरनं या बॉलर्सच्या मेन्टरची भूमिका बजावली आहे. त्यामुळे झहीरची बॉलिंग प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आल्याचं बीसीसीआय अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

मागच्या वर्षी रवी शास्त्रीऐवजी अनिल कुंबळेची प्रशिक्षक म्हणून निवड झाली होती. त्यावेळी रवी शास्त्रीनं सौरव गांगुलीवर गंभीर आरोप केले होते. गांगुलीमुळेच प्रशिक्षक म्हणून माझी निवड झाली नसल्याचं शास्त्री म्हणाला होता. मुलाखत घेताना सौरव गांगुली त्याठिकाणी नसल्याचंही शास्त्रीनं सांगितलं होतं.